आवरे-चेरपोलीत पाच दिवसांतून एकदा पाणी, रिकामे हंडे घेऊन शहापुरातील महिलांची पंचायत समितीवर धडक
तालुक्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आवरे-चेरपोलीत पाच दिवसांतून एकदा पाणी येते. तेही कमी दाबाने आणि फक्त 20 मिनिटे पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यामुळे पाणीटंचाईने हैराण झालेल्या शेकडो संतप्त महिलांनी रिकामे हंडे घेऊन पंचायत समितीवर धडक दिली आणि अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेचा शहापूर तालुक्यात अक्षरशः बोजवारा उडाला आहे. ‘हर घर में नल पर नल में नहीं जल’ अशी अवस्था या योजनेची झाली असून आवरे व चेरपोली परिसरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तर काही भागांत पाण्याचा टिपूसही येत नाही. तालुक्यातील 40 गावे व 139 पाडे अशा एकूण 179 गावपाड्यांसाठी 44 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र तोही पुरत नसल्याने उन्हाच्या काहिलीत हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आवरे आणि चेरपोली येथील महिलांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागावर धडक दिली. नळ असून नळाला पाणीच नाही, कधी पाणी येणार याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही, असे म्हणत महिलांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पाणीपुरवठा सुरळीत होणार
किसनबाबा भेरे नगर, साईनगर परिसरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करणे तसेच कोणत्या भागात, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत पाणीपुरवठा होणार याचे नियोजन करून व्हॉट्सअॅप अथवा दवंडीच्या माध्यमातून नागरिकांना पूर्वकल्पना देण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विजया पांढरे यांनी दिले. याशिवाय पाणीसाठा अपुरा असल्यास तातडीने टँकरद्वारे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
Comments are closed.