आयपीएल 2027 बद्दल बीसीसीआयचे टोकाचे पाऊल! 94 नाही तर 74 सामनेच, तारखांमध्येही मोठा बदल
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२७ च्या हंगामात सामन्याची संख्या वाढणार, अशा चर्चांना उधान आले होते. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. तसेच २०२७ हंगामाच्या संभाव्या तारखाही समोर आल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यातील हंगाम १० मार्चच्या आसपास सुरू करून १५ मे पर्यंत संपवण्याचा विचार सुरू आहे.
स्पर्धेदरम्यान तीव्र उन्हाळा टाळणे, त्याचबरोबर सध्याची रचना आणि स्पर्धात्मक संतुलन कायम राखणे, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. सैकिया यांनी याची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी सामन्यांची संख्या ७४ च राहिल आणि ९४ पर्यंत वाढवली जाणार नाही, हे पण स्पष्ट केले आहे.
मे महिन्याच्या अखेरीस हवामानाबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, तसेच आयपीएलच्या दोन महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक बसवण्याच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
मागील हंगाम पाहिले तर आयपीएल सहसा मार्च महिन्याच्या शेवटी सुरू होते आणि मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालते. याबद्दल सैकिया म्हणाले, “या वर्षी आयपीएल २९ (२८) मार्चच्या सुमारास सुरू झाली आणि ३१ मे पर्यंत संपली. आम्ही ज्या गोष्टीवर चर्चा करत आहोत ती म्हणजे, स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात १५ मे नंतर पाऊस किंवा मान्सूनपूर्व हंगाम सुरू होण्याची भीती आहे.”
“दुसरीकडे, उष्ण हवामान आहे जे खेळाडू आणि प्रेक्षक या दोघांसाठीही फारसे अनुकूल नाही. मार्च महिन्याच्या अखरेच्या आधी स्पर्धा सुरू करता येईल का? याबाबत बीसीसीआय तसेच आमच्या आयपीएल नियामक परिषदेमध्ये चर्चा सुरू आहे,” असेही ते पुढे म्हणाले आहेत.
सैकीया म्हणाले, “आयपीएल हंगामात सुलभ संक्रमण होण्यासाठी देशांतर्गत स्पर्धा मार्चच्या सुरुवातीपर्यंत संपतील याची खात्री करण्याकरिता बीसीसीआय प्रयत्न करत आहे. भारताची देशांतर्गत स्पर्धांची रचना आधीच अनेक महिने चालते, जी ऑगस्टच्या अखेरीस सुरू होते आणि मार्चमध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याने संपते. जर आयपीएल लवकर सुरू करायची असेल आणि हवामान व लॉजिस्टिकल आव्हाने एकाच वेळी येऊ नयेत असे वाटत असेल, तर हे वेळापत्रक सुव्यवस्थित करणे आवश्यक आहे.”
“आयपीएलसाठी दोन महिन्यांचा कालावधी असून तो आणखी वाढवणे अवघड जाईल, कारण इतर देशांनाही द्विपक्षीय सामने खेळायचे आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या ७४ वरून ९४ पर्यंत वाढवण्याबाबत सध्या कोणतीच चर्चा नाही,” असेही सैकिया म्हणाले आहेत.
यावेळी सैकिया यांनी असेही म्हटले की, केवळ भारताचा विचार न करत आयसीसी क्रिकेट खेळणाऱ्या इतर देशांच्या खेळाडूंच्या हितांचा विचार करणे आवश्यक आहे.
Comments are closed.