ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या ‘लीला’ हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; ‘मनपरिवर्तन’ टाळण्यासाठी शिंदे

शिवसेनेचे ऑपरेशन टायगर: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिलेला धक्का आता अधिक गडद झाला आहे. 18 जून रोजी दिल्लीत बोलावण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या बैठकीला ‘व्हीप’ (Whip) जारी करूनही लोकसभेच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी दांडी मारली. हे सर्व बंडखोर खासदार दिल्लीतील ‘लीला हॉटेल’मध्ये (The Leela Hotel) मुक्कामी असल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाकडून या खासदारांचे ‘मनपरिवर्तन’ करण्याचा किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ नये, यासाठी या सर्व 6 खासदारांना गुरुवारी पहाटेच दिल्लीतून थेट राजस्थानच्या जयपूर येथे हलवण्यात आल्याची अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Shivsena Operation Tiger: बैठकीला कोणी उपस्थित राहू नये म्हणून विशेष खबरदारी

ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी खासदारांच्या एकनिष्ठतेची ‘लिटमस टेस्ट’ घेण्यासाठी दिल्लीत संसदीय पक्षाची (Parliamentary Party Meeting) बैठक बोलावली होती. मात्र, ऐन वेळेवर बंडखोर खासदारांचे मन बदलू नये आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित राहू नये, याची अत्यंत चोख खबरदारी शिंदे गटाकडून घेण्यात आली. त्यामुळेच त्यांना दिल्लीच्या ‘लीला’ हॉटेलमधून थेट महाराष्ट्राबाहेर म्हणजेच जयपूरला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

Shivsena Operation Tiger: रात्री उशिरा 30 मिनिटांचा ‘कॉन्फरन्स कॉल’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जूनच्या रात्री अतिशय वेगवान घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लीला’ हॉटेलमध्ये असलेल्या सर्व 6 खासदारांसोबत तब्बल 30 मिनिटे ‘कॉन्फरन्स कॉल’वर सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे, ज्यांच्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता ते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे देखील या कॉलवर उपस्थित होते. “शिवसेना तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहील,” असे ठोस आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर या खासदारांचे पूर्ण मन वळले आणि त्यांनी ठाकरेंच्या बैठकीला न जाता जयपूरला जाण्याचा अंतिम निर्णय घेतला.

शिवसेना ऑपरेशन टायगर : श्रीकांत शिंदेची दिल्लीत फिल्डिंग

हे संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्याची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासाठी त्यांनी दिल्लीत ठाण मांडले होते. 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून तसे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ऑपरेशन आता यशस्वी झाले असून, ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच पाहूनच पुढील पावले टाकली जातील. पुढील दोन दिवस विलीनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली जाणार नाही किंवा कोणतेही फोटो अथवा पुरावे समोर आणले जाणार नाहीत.

Shivsena Operation Tiger: ठाकरे गट लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेणार?

‘व्हीप’ बजावूनही 6 खासदारांनी बैठकीला दांडी मारल्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. अनुपस्थित राहिलेल्या या 6 खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना अपात्र करण्यात यावे, यासाठी ठाकरे गट लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी मागणी नोंदवणार आहे. मात्र, 6 खासदारांकडे दोन-तृतीयांश बहुमत असल्यामुळे कायदेशीर लढाईत शिंदे गटच वरचढ ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आता आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Shivsena Operation Tiger: बंडखोर खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची साथ सोडणाऱ्या खासदारांच्या घराबाहेर पोलिस सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित खासदारांना इशारा दिल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे समजते.

दिल्लीत शिवसेना ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीत कोणकोण पोहोचले? (Shivsena Opration Tiger)

1. संजय राऊत (राज्यसभा)

2. अरविंद सावंत (लोकसभा)

3. अनिल देसाई (लोकसभा)

4. राजाभाऊ वाजे (लोकसभा)

ठाकरेंचे कोणकोणते खासदार बैठकीत गैरहजर- (Shivsena Opration Tiger)

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

आणखी वाचा

Ujjwal Nikam on Shivsena Operation Tiger: व्हीप जारी झाला, सहा खासदार गैरहजर राहिले, आता काय होणार? उज्ज्वल निकम यांचे कायदेशीर विश्लेषण, उपस्थित केले तीन मोठे प्रश्न

Comments are closed.