गद्दार खासदारांविरोधात राज्यात उद्रेक, जनता चिडली… ठिकठिकाणी प्रेतयात्रा, जोडे मारो, तुडवातुडवी, यवतमाळमध्ये संजय देशमुख यांचा पुतळा जाळला
शिवसेनेच्या सहा खासदारांनी गद्दारी करत मिंध्यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने जनता चिडली असून महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. गद्दारांच्या विरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ची सुरुवात ठिकठिकाणी झाली आहे. कुठे गद्दारांची प्रेतयात्रा, कुठे गाढवावरून धिंड, कुठे जोडे मारो आंदोलन, तर काही ठिकाणी गद्दारांचे घर आणि कार्यालयाच्या ठिकाणी शिवसैनिक व मतदारसंघातील नागरिकांकडून निदर्शने करून संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लोकसभेत निवडून आलेल्या 9 पैकी 6 खासदारांनी बैठकीला दांडी मारली. कालपरवापर्यंत आम्ही शिवसेनेसोबतच आहोत, कुठेही जाणार नाही अशा शपथा घेणाऱया या खासदारांनी बैठकीला दांडी मारत आपल्या गद्दारीवर शिक्कामोर्तब केले. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून गद्दारी करणाऱया खासदारांच्या मतदारसंघात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत.
नांदेडमध्ये आष्टीकरांच्या पुतळ्याचे दहन
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या विरोधात नांदेडमध्ये शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’, ‘नागेश पाटील मुर्दाबाद’, ‘शिवसेना के गद्दारो को जुते मारो साले को’ अशा आक्रमक घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी गद्दार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या पुतळ्याचे दहन केले.
परभणीत संजय जाधवांची अंत्ययात्रा
परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिकांचा संताप अनावर झाला. सोनपेठमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक होत संजय जाधव यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन केले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला. ‘गद्दार संजय जाधव’ अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संजय जाधव यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात आले. दरम्यान खासदार जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये संजय देशमुखांच्या पुतळ्याला जोडे मारो
यवतमाळमध्ये गद्दार खासदार संजय देशमुख यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. ‘गद्दारांचा निषेध असो’, ‘संजय देशमुख मुर्दाबाद’ अशा घोषणा देत आंदोलक शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेनेच्या विचारांशी व पक्षप्रमुखांच्या विश्वासाशी केलेली प्रतारणा कदापि सहन केली जाणार नाही. शिवसैनिकांच्या भावनांशी खेळणाऱया नेत्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
संजय पाटील यांच्याविरोधात उग्र निदर्शने, फोटोला जोड्याने बडवले
ईशान्य मुंबईत गद्दार खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात शिवसैनिकांच्या संतापाचा भडका उडाला. भांडुपमध्ये विभागप्रमुख रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत यांच्यासह विभाग संघटक रश्मी पहुडकर, दीपमाला बडे, सुरेश शिंदे, श्वेता पावसकर तसेच मोठय़ा संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ‘नीम का पत्ता कडवा है, संजय पाटील भडवा है’, अशा घोषणा देत गद्दार खासदारांच्या फोटोंना यावेळी जोडय़ाने बडवण्यात आले. घाटकोपरमध्येही काळे झेंडे फडकवत शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्यासह घाटकोपर विधानसभा समन्वयक इम्रान शेख, विधानसभा प्रमुख सुभाष पवार, उपविभागप्रमुख विलास पवार, शाखाप्रमुख संजय कदम, अजय भोसले, महाविकास आघाडीचे शरद कदम यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
Comments are closed.