NEET फेरपरिक्षा देण्यासाठी 18 वर्षीय आरोपीला जामीन मंजूर, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आहे अटकेत
मुंबईतील एका विशेष पोक्सो न्यायालयाने बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत तुरुंगात असलेल्या एका 18 वर्षीय तरुणाला २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’ (NEET) फेरपरीक्षेला बसता यावे, यासाठी चार दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी गुरुवारी या आरोपीला जामीन मंजूर केला. हा तरुण सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. पीडित मुलीने या जामिनाला कोणतीही हरकत नसल्याचे कोर्टात सांगितले, मात्र जामिनावर असताना आरोपीने तिच्या कुटुंबाची बदनामी करू नये किंवा त्यांना धमकावू नये, अशी अट घातली आहे.
या तरुणाला १८ जून ते २१ जून या कालावधीसाठी हा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर (surety) हा जामीन देण्यात आला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) संपल्यानंतर, २२ जून रोजी दुपारी २ पर्यंत आरोपीला कारागृह प्रशासनासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या १८ वर्षीय तरुणावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण’ (POCSO) कायदा, २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपीने कोणत्याही प्रकारे पीडितेशी संपर्क साधू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये किंवा केसशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला धमकावू नये असे न्यायालयाने त्याला बजावले आहे. तसेच तो नक्की परीक्षेला बसेल असे हमीपत्र लिहून देण्यास आणि शरण येताना परीक्षेला बसल्याचे पुरावे सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.
Comments are closed.