स्मार्ट सिटीचे गाजर बंद करा! शिवसेनेने वाचला तक्रारींचा पाढा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीचे गाजर बंद करून आधी शहरातील कचरा, दुर्गंधी, नालेसफाई, पाणीटंचाई, रस्त्यांची अर्धवट कामे याकडे आधी लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘ह’ प्रभाग क्षेत्राचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

डोंबिवली शहरातील अनधिकृत फेरीवाले, होर्डिंग्ज, बॅनर, कमानी, वॉर्डातील पाण्याची समस्या, ठिकठिकाणी साचलेली माती व कचऱ्याचे ढिगारे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच त्यांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख सुरेश परदेशी व उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अभिमान पवार यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ‘ह’ प्रभाग क्षेत्राच्या कार्यालयासमोरच माती तसेच सहाय्यक आयुक्त कचऱ्याचा ढिगारा असल्याचे सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. स्मार्ट सिटीच्या बाता मारण्याऐवजी आधी नागरी समस्या सोडवा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

यावेळी राहुल चौधरी, युवासेना विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, उपशहर संघटक निशा रेड्डीज, राजू पवार, विभागप्रमुख अनिल मुथा, शाखाप्रमुख अनिल विश्वकर्मा, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम सुरकुंडे, सुधाकर जाधव, योगेश कुबल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.