वैभव सूर्यवंशीनंतर बिहारच्या 15 वर्षीय लेकीचा धमाका! 126 चेंडूत ठोकल्या नाबाद 306 धावा
ज्याप्रमाणे अवघ्या १५ व्या वर्षी आपल्या प्रतिभेने वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्वाला थक्क केले आणि भविष्यातील सुपरस्टार्सच्या यादीत स्थान मिळवले, त्याचप्रमाणे बिहारमधील एका खेळाडूनेही याच वयात फलंदाजीची एक अविश्वसनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बिहार महिलांच्या १९-वर्षांखालील (Under-19) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत, रक्सौल या सीमावर्ती शहरातील १५ वर्षीय अक्षरा गुप्ताने केवळ १२६ चेंडूंमध्ये नाबाद ३०६ धावांची खेळी करून सर्वांना चकित केले. अक्षराची ही खेळी बिहार क्रिकेटसाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे; इतक्या लहान वयात त्रिशतक झळकावणारी ती बिहार महिला क्रिकेटमधील पहिली खेळाडू ठरली आहे.
भागलपूर येथील सँडिस कंपाऊंड मैदानावर खेळल्या गेलेल्या बिहार महिलांच्या १९-वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात अक्षरा गुप्ताची आक्रमक फलंदाजी शैली पाहायला मिळाली. तिने एकूण १२६ चेंडूंचा सामना करत २३३ मिनिटे फलंदाजी केली. या मध्ये तिने ५५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ३०६ धावा केल्या.
अक्षरा गुप्ताचा स्ट्राईक रेट प्रभावी असा २४२.०८ इतका होता. विशेष म्हणजे, तिने आपल्या एकूण धावांपैकी २६८ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून केल्या. तिने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, यावरून तिच्या खेळीची भव्यता स्पष्ट होते. या कामगिरीसह, भारतीय देशांतर्गत महिला क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या निवडक खेळाडूंच्या गटात अक्षरा सामील झाली आहे. देशांतर्गत महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विचार करता, हा विक्रम मुंबईच्या इरा गुप्ताच्या नावावर आहे, जिने ३४६ धावांची खेळी केली होती.
अवघ्या १५ व्या वर्षी ३०६ धावा करून अक्षरा गुप्ताने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे आणि भविष्यासाठी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. वैभव सूर्यवंशीप्रमाणेच, डावखऱ्या अक्षरा गुप्तानेही इन्स्टाग्रामवर तिच्या नेट प्रॅक्टिसचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती कसून सराव करताना दिसत आहे. अक्षरा गुप्ता या क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये बिहार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू देखील आहेत.
Comments are closed.