बंडू जाधवांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, शिवसेना वर्धापनदिनी पोस्टवरुन मशाल गायब, म्हणाले, ‘अखंड शिव

ऑपरेशन टायगर UBT शिवसेना खासदार संजय जाधव: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेले ठाकरे गटाचे परभणी लोकसभा मतदारसंघातील खासदार बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी आता आपली निष्ठा एकनाथ शिंदेंच्या चरणी असल्याचे स्पष्ट केले आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यासाठी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाचे दोन स्वतंत्र मेळावे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर फुटीर खासदार बंडू जाधव (Bandu Jadhav) यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. बंडू जाधव यांच्या या पोस्टवरुन बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत आहेत. (Maharashtra Politics News)

खासदार बंडू जाधव यांच्या या पोस्टवरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चिन्ह असलेली मशाल गायब आहे. या पोस्टवर उद्धव ठाकरे यांचा फोटोही नाही. फक्त बाळासाहेब ठाकरे  यांचा फोटो आहे. ‘अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व… 60 वर्ष हिंदुत्वाशी वचनबद्धता’, असा मजकूर या पोस्टवर लिहला आहे. त्यामुळे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्माची पालखी वाहणाऱ्या बंडू जाधव यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्त्वाची मशाल हातात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर बुधवारी यशस्वी झाले होते. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील, संजय देशमुख,संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांना फोडण्यात यश मिळवले होते. हे खासदार आज मुंबईतील शिंदे गटाच्या वर्धापन दिन मेळाव्यात पक्षप्रवेश करणार होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे या सहा फुटी खासदारांचा शिंदे सेनेतील पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. यापैकी काही खासदार सध्या राजस्थानमध्ये अज्ञातस्थळी असल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना तुडवा, असे वक्तव्य केल्याने या खासदारांच्या सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे या सर्वांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. हे खासदार पुन्हा दबावात येऊन आपला निर्णय फिरवतील, ही शक्यता लक्षात घेऊन या खासदारांना महाराष्ट्राबाहेर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Shivsena News: शिंदे सेनेकडून वर्धापनदिनाची जय्यत तयारी

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन आहे. अशात, नेस्को सेंटरबाहेर मोठी बॅनरबाजी कार्यकर्त्यांकडून आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. जनात शिवसेना, मनात शिवसेना अशी टॅगलाइन घेत सर्वत्र भागात हे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. काल रात्री दिल्लीतून परतल्यानंतर  खासदार श्रीकांत शिंदे यांनी नेस्को सेंटर इथे पाहणी केली.

आणखी वाचा

नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, ‘तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट…’

Comments are closed.