प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे निर्वाण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

परभणी येथील पाथरी येथील शिवाश्रमाचे प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एका अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुजरात येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून महाराज छत्रपती संभाजीनगर येथे परतत असताना धुळे-सोलापूर महामार्गावरील निपाणी फाट्याजवळ हा अपघात झाला.

शहरातील एका खाजगी रुग्णालयात महाराजांना दाखल करण्यात आले परंतु काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच महाराजांचा शिष्यपरिवार रुग्णालयात दाखल झाला. यावेळी महाराजांसमवेत त्यांच्या लहान भावाची पत्नी स्मिता हणमंतराव बोरीकर (सातारा) या देखील होत्या. त्यांचेही या अपघातात निधन झाले. तसेच लहान भावाचे जावई आशुतोष डुघरेकर हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महाराजांच्या पार्थिव शरीरावर शनिवारी सकाळी गुंज येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. महाराजांचा केवळ मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात देखील खूप मोठा शिष्य परिवार आहे. प. पू. कालिदास महाराज हे ब्रह्मचारी व मौनी होते. केवळ दत्त गुरूंच्या आराधनेची पंचपदी वगळता ते कायम मौनात असत. कालिदास महाराजांच्या निधनामुळे सर्वदूर पसरलेल्या त्यांच्या शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे.

Comments are closed.