पाय मुरगळला अन् घात झाला! सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपचं स्वप्न डोळ्यांदेखत भंगलं, श्रेयंका पाणावल्य

श्रेयंका पाटील महिला T20 विश्वचषक 2026 मधून बाहेर : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सलग दोन सामने जिंकून शानदार सुरुवात करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाची स्टार ऑफस्पिनर ऑलराउंडर श्रेयंका पाटील दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. बीसीसीआयने (BCCI) तिच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

मैदानावर काय घडलं?

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. आपल्या स्पेलमधील पहिलाच चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना श्रेयंकाचा उजवा पाय मुरगळला. दुखापत इतकी गंभीर होती की तिला स्वतःच्या पायावर उभे राहणेही कठीण झाले होते. अखेर मेडिकल स्टाफने तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या घोट्याच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले, ज्यामुळे तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

दुखापतींचे सत्र कायम

23 वर्षीय श्रेयंकासाठी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याची ही पहिली वेळ नाही. 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर गेली होती. महिला सीपीएल 2025 आणि डब्ल्यूपीएल (WPL) 2026 मध्ये तिने शानदार पुनरागमन करत उत्कृष्ट कामगिरी केली होती. अशा फॉर्मात असताना वर्ल्ड कपसारख्या मोठ्या मंचावरून बाहेर पडणे तिच्यासाठी आणि संघासाठी अत्यंत निराशाजनक आहे.

प्रेमा रावतची संघात निवड

बीसीसीआयने श्रेयंका पाटीलच्या जागी 24 वर्षीय लेगस्पिनर प्रेमा रावतचा संघात समावेश केला आहे. प्रेमा रावतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली असून, उत्तराखंडच्या संघाला सीनियर चॅम्पियनशिप जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाकडून खेळते. तिने आतापर्यंत 6 सामन्यांत 3 बळी घेतले आहेत.

भारतीय संघाचे पुढील आव्हान

भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव करून स्पर्धेत मजबूत पकड निर्माण केली आहे. भारताचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. श्रेयंकाची कमतरता नक्कीच भासेल, पण प्रेमा रावतच्या येण्याने फिरकी विभागाला नवीन पर्याय मिळाला आहे. आता उर्वरित खेळाडू ही जबाबदारी कशी सांभाळतात आणि विजयाचा रथ कसा पुढे नेतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

हे ही वाचा –

FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा उलटफेर! 52 वर्षांनी तो आफ्रिकन देश वनवास संपवून आला, अन् रोनाल्डोला रडवून गेला, मध्यरात्री अमेरिकेत नेमकं काय घडलं?

Comments are closed.