भारतीय महिला हॉकी संघाचा चिलीवर 6-0 ने दणदणीत विजय, टीम इंडिया नेशन्स कप 2025-26 च्या अंतिम फेरीत दाखल
भारतीय संघाने शनिवारी (२० जून) ऑकलंड येथे झालेल्या एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप न्यूझीलंड २०२५-२६ च्या उपांत्य फेरीत चिलीवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला. या स्पर्धेतील आपल्या सलग चौथ्या विजयासह भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारतासाठी नवनीत कौर, दीपिका, नेहा आणि ऋतुजा दादासो पिसाळ यांनी गोल केले. तसेच कर्णधार सलीमा टेटेला तिच्या उल्लेखनीय अष्टपैलू कामगिरीमुळे प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना अमेरिका किंवा यजमान न्यूझीलंडशी होईल.
या सामन्यात चेंडूवर सुरूवातीपासूनच भारताचे नियंत्रण दिसले, कारण संघाला सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याचे नवनीतने गोलमध्ये रुपांतर करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १३ व्या मिनिटाला सलीमाने अप्रतिम धाव आणि क्रॉसवर चिलीच्या पोस्टसमोर नवनीतला चेंडू पास केला. त्यावर तिने गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. १४ व्या मिनिटाला ड्रॅगफ्लिकर दीपिकाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताची आघाडी आणखी वाढवली आणि १८ व्या मिनिटाला पुन्हा गोल करत भारताची आघाडी ४-० अशी केली.
दीपिकाने या सामन्यात केलेल्या दोन गोलमुळे ती या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचली. भारत ४-० च्या भक्कम आघाडीसह दुसऱ्या संत्रात पोहोचला. ३२ व्या मिनिटाला नेहाने आणखी एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. ३९ व्या मिनिटाला ऋतुजाने ओपन प्लेमधून रिव्हर्स हिट मारून भारताची आघाडी ६-० अशी केली.
शेवटच्या काही मिनिटांमध्ये चिलीने गोल करण्याचे प्रयत्न केले, मात्र सविताने त्याचा अप्रतिम बचाव केला. तिने उत्तम कामगिरी करत चिलीचे दोन प्रयत्न हाणून पाडले. भारताने ६-० विजय निश्चित केला.
Comments are closed.