अभिप्राय – ज्येष्ठांच्या हृदयस्पर्शी कथा

>> आराधना कुलकर्णी

ज्येष्ठांच्या आयुष्याची संध्याकाळ… ती फक्त वयाची नाही, तर भावनांचीही कसोटी असते. माणसामाणसांतील जिद्द आणि सेवाभाव जपणारे अनुभव शब्दबद्ध झाले की, त्या लेखनाला मानवी एक हृदय प्राप्त होते. डॉ. बालाजी आसेगावकर लिखित ‘स्नेहबंधातील ठेव’ हा ज्येष्ठांच्या हृदयस्पर्शी कथांचा संग्रह अशी प्रचीती देणारा आहे. यातील सर्व कथा सत्य, लालित्यपूर्ण तसेच सामाजिक भाव जागवणाऱया आहेत. लेखकाच्या संवेदनशीलतेमधून या कथांनी आकार घेतलाय. या सत्यकथा मानवी मनाचे, स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे उलगडतात. कधी प्रेम, माया, आनंद, तर कधी वेदना, आश्चर्य आणि एकटेपणाचे दर्शन घडवितात.

लेखक वैद्यकीय क्षेत्रात हृदय-भूततज्ञ म्हणून कार्यरत असताना त्यांच्या हे लक्षात आले की, आजारपण, असहाय्यता, एकटेपणा, कुटुंबीयांच्या मर्यादा इ. कारणांमुळे अनेक वृद्धांना आणि दीर्घकाल परावलंबी रुग्णांना सम्मानपूर्वक काळजी व आधारची जी गरज असते तिची उणीव आहे. ती उणीव भरून काढणे आवश्यक आहे या सामाजिक जाणिवेतून निस्वार्थ भावनेने, मित्र-परिवाराच्या साथीने त्यांनी ‘स्नेहसावली केंद्र’ ही संस्था छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन केली. वृद्धांना वैद्यकीय उपचारांसोबत घरच्या व्यक्तीसारखे वागवणे, त्यांना प्रेम, आदर, सुरक्षितता देणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत.

हे पुस्तक केवळ घटनांचे किंवा अनुभवांचे संकलन नाही, ती आहे मनाला स्पर्शून जाणारी अश्रूंची, उमलण्याच्या स्मितींची आणि निस्वार्थ सेवेतून लाभलेल्या आत्मिक समाधानाची साक्ष. ‘माणसाने माणसाशी माणूसाम वागणे’ ही सत्य-स्थितीत खरे तर अवघड असणारी उक्ती येथे मात्र कृतीत सहजपणे अवतरताना दिसते. स्नेहसावली संस्थेची स्थापना आणि तिची आजवरची वाटचाल या पुस्तकातून स्पष्ट होते. संस्थेतील ज्येष्ठांच्या कथा हा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. ते संस्थेत का आले, तिथे कसे रमले, त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक उपचार कसे केले जातात, सर्वांची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी एक आत्मीय जिद्द त्यांच्या आईची नीट काळजी घेतली जावी आणि तिला आपल्याशिवाय राहण्याची सवय झाली म्हणून संस्थेत दाखल करतो, तर याउलट ‘एका निर्मात्याची गोष्ट’ ही कथा माणसाच्या हृदयशून्यतेची प्रचीती देणारी आहे.

स्मृतिभंश झालेल्या 90 वर्षांच्या आत्याची जबाबदारी टाळण्यासाठी तिला एकटीला रिक्षात बसवून सोडून देण्याचा बेत केला जातो. मात्र संस्थाचालकांना हे समजल्यावर तिला संस्थेत मोफत दाखल करून घेण्यात येते. मंदबुद्धी समजला गेलेला, एक पाऊलही टाकून न शकणारा नैराश्यग्रस्त तरुण मुलगा संस्थेत दाखल होतो आणि तेथील उपचारानंतर स्वागतकक्षाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळतो हे ‘तो राजहंस एक’ या कथेतून समोर येते. कंपवात असणारे काका या संस्थेतील उपचारांमुळे आणि भाषांतील प्रभुत्वामुळे आठ, दहा पुस्तकांचे उत्कृष्ट अनुवादक होतात, ते ‘मी कात टाकली’ या कथेतून समजते. लेखकाची भाषा साधी तरी प्रभावी, मनाला भावणारी आहे.

भाषा, अनुभवांची सत्यता, प्रामाणिकपणा, प्रत्येक कथेला लाभलेला मानवी स्पर्श, सामाजिक झगड फेडण्याचे भान ही या पुस्तकाची बलस्थाने आहेत. वृद्धत्व आणि आजारांमुळे येणारे परावलंबन हे प्रत्येक कुटुंबातील एक अनिवार्य वास्तव आहे. म्हणून चिंतनास प्रवृत्त करणारे हे पुस्तक सर्व वयोगटांतील वाचकांनी वाचायला हवे.

पुस्तकाचे सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ लक्षणीय, दर्शनीय आणि वैशिष्टय़पूर्ण चित्ररचनेमुळे ‘स्पर्शनीय’ दिसत आहे. सामाजिक कार्यात रस असणाऱयांसाठी तसेच डॉक्टर, केअरगिव्हर्स आणि नातेसंबंध समजून घेऊ इच्छिणाऱयांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

स्नेहबंधातली ठेव

लेखक: डॉ. बालाजी आसगावकर

प्रकाशन: साकेत प्रकाशन

पृष्ठ: १५२ ता किंमत ः रु. 200

Comments are closed.