टिनू यादव राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाबाबत
विश्वस्त चंपत राय यांचा यादव हा घनिष्ट सहकारी
वृत्तसंस्था, अयोध्या
अयोध्येत रामजन्मभूमी स्थानी निर्माण करण्यात आलेल्या भव्य राममंदिराला देण्यात आलेल्या देणग्यांच्या अपहाराचे प्रकरण सध्या गाजत आहे. हे निर्माणकार्य करणाऱ्या रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष चंपत राय यांचा घनिष्ट सहकारी टिन्नू यादव याची चौकशी करण्यात येत असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
टिन्नू यादव याचे खरे नाव रामशंकर यादव असे आहे. या अपहाराचे अन्वेषण करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष अन्वेषण दलाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या दलाने शनिवारी राम मंदिराला भेट दिली. त्यांनी मंदिराच्या रोख देणगी कक्षाचीही तपासणी केली. या मंदिराच्या देणग्यांच्या अपहाराची रक्कम आत्तापर्यंतच्या तपासानुसार 100 ते 120 कोटी रुपये इतकी आहे. मंदिराला देणगी म्हणून दिल्या गेलेल्या अनेक चांदीच्या शिळा तसेच इतर वस्तू आणि दानपेटीतील रक्कमही लांबविली गेल्याचे स्पष्ट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शेकडो कोटी रुपयांच्या देणग्या
2024 मध्ये या राम मंदिरात भगवान श्री रामल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर या मंदिराला भक्त आणि भाविकांकडून शेकडो कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. तसेच सुवर्णाच्या आणि चांदीच्या शिळा, आभूषणे, पूजापात्रे आणि इतर असंख्य वस्तूंचे दानही मिळाले आहे. मात्र, देणगीची रक्कम आणि सोने-चांदीच्या वस्तू आणि शिळा यांची काही प्रमाणात चोरी झाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यानंत आता मंदिराच्या व्यवस्थापनावर संशय व्यक्त केला जात आहे. या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या न्यासाचे अध्यक्ष चंपत राय हे आहेत. त्यांच्यावरही संशय व्यक्त केला जात असून त्यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. रामशंकर यादव हा या अपहार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत अपहार झालेल्या धनापैकी 2 कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. मात्र, एकंदर रक्कम खूप मोठी असावी, असे अन्वेषण दलाचे अनुमान आहे. या प्रकरणाचे पडसाद देशभर आहेत.
पंधरा दिवसांमध्ये सत्य शोधणार
हे अपहार प्रकरण अत्यंत गंभीर आणि क्लेषदायक आहे. पण हा अपहार कोणीही केलेला असो, त्याला सोडले जाणार नाही. अशा व्यक्ती कितीही उच्च स्थानांवर असल्या तरी त्यांना क्षमा नाही. येत्या 15 दिवसांमध्ये या प्रकरणात कठोर कारवाईला प्रारंभ होईल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकरण नेमके काय आहे…
राम मंदिराचे निर्माणकार्य होत असताना आणि ते पूर्ण झाल्यानंतर या मंदिराला भारतातील आणि भारताच्या बाहेरील असंख्य रामभक्तांनी सढळ हस्ते देणग्या दिलेल्या आहेत. प्रतिदिन मंदिराच्या दानपेटीत मोठे धन संकलित होत असते. सोन्या-चांदीच्या वस्तूंच्या आणि शिळांच्या रुपातही मंदिराला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांपैकी कोणीतरी या सोन्या-चांदीच्या वस्तू लांबविल्या असून त्यांच्या स्थानी स्वस्त धातूंच्या तशाच दिसणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत, असा आरोप आहे. तसेच देणगीच्या निधीचही अपहार करण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी हे प्रकरण उघडकीस आले असून त्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
Comments are closed.