मुलीच्या शरीरात चार अर्ध्या किडनी.
ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. या राज्यातील एका सात वर्षाच्या बालिकेच्या शरीरात चार अर्धी मूत्रपिंडे आहेत, असे दिसून आले आहे. अशा प्रकारचे हे प्रथमच प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे डॉक्टर्हही चक्रावून गेले आहेत. सर्वसाधारणपणे कोणत्याही व्यक्तीला दोन मूत्रपिंडे (किडनीज) असतात. या दोन मूत्रपिंडातून प्रत्येकी एक नलिका बाहेर आलेली असते आणि या दोन्ही नलिका पुढे मूत्राशयाला मिळतात, जेथे मूत्र साठविले जाते. जवळपास प्रत्येकाची शरीर रचना अशीच असते. पण या बलिकेच्या संदर्भातही समस्या बरीच भिन्न आहे.
तिच्या शरीरात दोन मूत्रपिंडे नसून चार आहेत. पण चारही मूत्रपिंडांपैकी एकाचीही वाढ पूर्ण झालेली नाही. चारही मूत्रपिंडे नेहमीच्या आकाराच्या अर्धीच आहेत. तसेच ती एकमेकांना जोडलेली असून त्यांच्यातून चार नलिका बाहेर आलेल्या आहेत. या मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे तिचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले. त्यावेळी ही आश्चर्यकारक बाब उघड झाली. या मूत्रपिंडांची संरचना आता सुधारावी लागणार आहे. त्यासाठी यंत्रमानवाच्या साहाय्याने एक जटील शस्त्रक्रिया करावी लागणार असून ती बरीच खर्चिकही आहे. सध्या या मुलीला फारसा त्रास होत नसला, तरी पुढे तिला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या चार मूत्रपिंडाची जोडणी दोन मूत्रपिंडांमध्ये करावी लागणार आहे. शस्त्रक्रिया अवघड असली, तरी यशस्वी होईल, असा विश्वास डॉक्टरांना असून त्यांनी शस्त्रक्रियेसाठी सज्जताही करण्यास प्रारंभ केला असून अशा प्रकारची समस्या जगात अन्यत्र कोठे उद्भवली आहे काय, याची चाचपणी करण्यात त्यांनी प्रारंभ केला आहे. भारतातही अन्य मोठ्या रुग्णालयांकडून मूत्रपिंडांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची माहिती मिळविली जात आहे. सध्या भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात या प्रकरणाची चर्चा होत असल्याचे वृत्त आहे. या बालिकेच्या मातापित्यांनाही चिंता वाटू लागली असून त्यांनी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्या कन्येच्या प्रकृतीत सुधारणा होईल काय, या दृष्टीने प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. चार मूत्रपिंडे एकमेकांना जोडून त्यांची दोन मूत्रपिंडे करणे, हे या शस्त्रक्रेयेचे उद्दिष्ट आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास या बलिकेला तर लाभ होणार आहेच, पण डॉक्टरांचीही ख्यातीही वाढणार आहे.
Comments are closed.