पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य, पंतप्रधान मोदींची घोषणा

पश्चिम बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचे प्रयत्न झाल्याचाही आरोप

वृत्तसंस्था/ कोलकाता, हुगळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थिती दर्शवत मागच्या सरकारवर हल्लाबोल चढवला. आता राज्यात कायद्याचे राज्य सुरू झाले असून यापूर्वी बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप केला. ही कुरापत सुरू असताना काँग्रेसने त्या कटवाल्यांपुढे शरणागती पत्करली, असेही ते म्हणाले. धार्मिक अजेंड्यांमुळे बंगालचा आवाज दाबला जात असताना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी ठराव मंजूर करून बंगाल पाकिस्तानचा भाग बनणार नाही असे घोषित केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. याप्रसंगी त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 23 वा हप्ता जारी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर 47 दिवसांनी पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. यावेळी हुगळी येथे आयोजित मेळाव्यामध्ये त्यांनी यापूर्वी राज्यात सत्ता सांभाळणाऱ्या सर्व पक्षांवर तोफ डागली. आपल्या दौऱ्यादरम्यान ‘भारताच्या विकासाचे नेतृत्व करू शकणारा बंगाल मागे पडला आहे. बंगालवर परकीय विचारसरणी लादली गेली आहे. आधी काँग्रेस, डावे आणि नंतर टीएमसीने बंगालला अवैध स्थलांतरितांचे केंद्र बनू दिले’ असे मोदी म्हणाले. भाजपच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार आता राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी सातत्याने काम करत आहे.

पश्चिम बंगाल बंधनातून मुक्त

निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये एक नवीन वातावरण निर्माण झाले असून, राज्य विकासाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. बंगालमधील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसत आहे. ही स्थिती लोकशाही आणि मताच्या शक्तीचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. निवडणुकीदरम्यान आम्ही आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. आता पश्चिम बंगालमधील प्रत्येक गरीब व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करण्यात आली आहे. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांनाही थेट लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

विकासाकडे वाटचाल

एकेकाळी खराब रस्ते आणि मोडकळीस आलेल्या पायाभूत सुविधांशी झगडणारा बंगाल आता जलद विकास अनुभवत आहे. कोलकाता मेट्रोच्या ऑरेंज लाईनवरील चिंगरीघाटा क्रॉसिंगचे उदाहरण देताना ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून रखडलेले काम आता पूर्ण झाले असून प्रलंबित प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहेत. भारत 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्व भारताच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देऊन, केंद्र सरकार ‘मिशन पूर्वोदय’ अंतर्गत या प्रदेशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती देत आहे.

सीमा कुंपणाच्या कामाला सुरुवात

मागील सरकारांनी भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमिनीच्या हस्तांतरणाला अनेक दशके खीळ घातली होती. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रक्रियेला गती देण्यात आली आणि सीमा सुरक्षेशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सुरुवात झाली, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

किसान सन्मान निधीचा 23 वा हप्ता जारी

पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील कार्यक्रमातूनच देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23 वा हप्ता वितरित केला. याअंतर्गत, देशभरातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. एकट्या बंगालमध्येच 45 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात 900 कोटी रुपये जमा करण्यात आले. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी हावडा येथे संक्रैल-संत्रागाची लिंक लाईन प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यांनी 300 खाटांच्या नवीन रेल्वे रुग्णालयाची पायाभरणी केली आणि पूर्व मेदिनीपूरमध्ये हाओर-राधामोहनपूर रोड ओव्हरब्रिज प्रकल्पाची पायाभरणी केली.

ओडिशामध्ये 47,600 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ

ओडिशामधील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘विकास रा धारा, ओडिशा सारा’ कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. मयूरभंज जिह्यातील रायरांगपूर येथे त्यांनी सुमारे 47,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हेही उपस्थित होते. राष्ट्रपती मुर्मू यांचा 68 वा वाढदिवस असल्याने पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना शुभेच्छा देताना त्यांनी केवळ मयूरभंजचीच नव्हे, तर संपूर्ण ओडिशा राज्याची ओळख अधिक मजबूत केल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्मू यांचे सासरचे गाव असलेल्या पहारपूरला ‘सौर गाव’ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली. गावातील प्रत्येक घराला सौरऊर्जा पुरवली जाईल आणि कोणार्क सूर्यमंदिराप्रमाणे पहारपूरला एक नवीन आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.