150 किलो चांदी, 40 लाखांची रोकड…; वाहतूक पोलिसाने ट्रॅव्हल्स थांबवली अन् आतलं दृश्य पाहून अधि

सातारा क्राईम न्यूज : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात वाहतूक नियंत्रणाचे नेहमीचे काम सुरू असताना अचानक असे काही घडले, ज्याने पोलीस प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. शहर वाहतूक शाखेच्या एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका ट्रॅव्हल्समधून तब्बल 150 किलो चांदी (Silver) आणि 40 लाख रुपयांची रोकड (Cash) जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या या गुप्त साठ्याची अंदाजे किंमत साडेतीन कोटी रुपये असून, या कारवाईनंतर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल पवार हे शहरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सवर त्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून त्याची झडती सुरू केली. वाहनाचा कोपरा न् कोपरा तपासत असताना अचानक पोलिसांच्या हाती सोने-चांदी व्यापाऱ्याशी संबंधित असलेला चांदीचा साठा लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मुद्देमाल पाहून अमोल पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता या घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना दिली.

Satara Crime News: वरिष्ठ अधिकारी ॲक्शन मोडमध्ये; पोलीस ठाण्यात धावपळ

माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी तातडीने कराड शहर पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना पुढील कारवाईचे आदेश दिले. यानंतर संबंधित संशयास्पद वाहन आणि कोट्यवधींचा मुद्देमाल पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या 150 किलो चांदीची आणि 40 लाखांच्या रोकडीची कागदपत्रे (Documents), जीएसटी बिले (GST Bills) आणि इतर कायदेशीर परवान्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केली.

Satara Crime News: आयकर विभागाची एन्ट्री

एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रक्कम आणि चांदी आढळून आल्याने या प्रकरणात आता प्राप्तिकर विभागाची (Income Tax Department) एन्ट्री झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर आयकर विभागाचे विशेष पथक कराडला दाखल झाले आहे. मिळालेला मुद्देमाल अधिकृत आहे की हवाला किंवा काळ्या पैशांशी संबंधित आहे? याची कसून खातरजमा करण्याचे काम पोलीस आणि आयकर विभागाकडून संयुक्तपणे सुरू आहे. पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी या कारवाईच्या बातमीने व्यापारी वर्गात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुढील तपासात या साडेतीन कोटींच्या साठ्याचे खरे मालक कोण, याचे रहस्य समोर येणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Pune News: कोल्हापूरहून जेजुरीला जाणाऱ्या मिनी बसला ट्रकची जोरदार धडक; अपघातात 2 जण जागीच ठार, तर 5 जखमी; पुणे-बेंगलोर हायवेवरील भीषण घटना

Comments are closed.