टी-20 वर्ल्ड कपमध्ये उलटफेर! 124 धावांच्या साध्या आव्हानासमोर पाकिस्तानचे डोळे फिरले, थेट स्पर्
पाकिस्तान महिला विरुद्ध बांगलादेश महिला ICC महिला T20 विश्वचषक 2026 : महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशने कमालीची कामगिरी करत पाकिस्तानला 23 धावांनी धूळ चारली आहे. रोज बाउल मैदानावर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने दिलेल्या 124 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या 100 धावांवर आटोपला. या पराभवामुळे पाकिस्तानची स्पर्धेत पराभवाची हॅटट्रिक झाली आहे, तर बांगलादेशने 3 सामन्यांत दुसरा विजय नोंदवला आहे. महिला टी-20 क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धचा हा फक्त पाचवा विजय आहे. 2025 च्या विश्वचषकानंतर सलग दुसऱ्यांदा बांगलादेशने पाकिस्तानला विश्वचषकात पराभूत केले आहे.
शोर्ना अख्तरची वादळी खेळी
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्येच त्यांनी अवघ्या 24 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. मात्र, कर्णधार निगार सुल्ताना आणि सोभना मोस्तरी (22 धावा) यांनी डाव सावरला. शेवटच्या षटकांमध्ये शोर्ना अख्तरने 22 चेंडूत 39 धावांची झंझावाती खेळी करत बांगलादेशला 6 बाद 123 धावांपर्यंत पोहोचवले. पाकिस्तानकडून फातिमा सनाने 18 धावांत 2, तर नश्रा संधूने 14 धावांत 1 विकेट घेतली.
पाकिस्तानी फलंदाजी पत्त्यांसारखी कोलमडली
124 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. मुनिबा अली (25) आणि गुल फिरोझा (23) यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. मात्र, फिरोझा बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्यांसारखा कोलमडला. आयेशा जफर (11) आणि कर्णधार फातिमा सना (10) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. संपूर्ण संघ 20 षटकांत 8 बाद 100 धावाच करू शकला.
बांगलादेशी गोलंदाजांची शानदार कामगिरी
बांगलादेशच्या विजयात फिरकीपटूंनी मोलाची भूमिका बजावली. संजिदा अख्तर (21 धावांत 3 बळी) आणि नाहिदा अख्तर (18 धावांत 3 बळी) यांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. राबिया खान आणि रितू मोनी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत त्यांना उत्तम साथ दिली.
सलग तिसरा मानहानिकारक पराभव
पाकिस्तानला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आणि संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान, बांगलादेशने आपला दुसरा विजय मिळवून गुणतालिकेतील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. हा संघ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एकाच हंगामात दोन सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.