6, 4, 4, 4, 6, 6! डंबुलामध्ये वैभव सूर्यवंशीची तडाखेबाज फलंदाजी, 11 चेंडूत अर्धशतक ठोकत ‘बेबी बॉस’चा वर्ल्ड रेकॉर्ड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या आणि धडाकेबाज फलंदाजीने क्रीडा प्रेमींना वेड लावणाऱ्या वैभव सूर्यवंशी अर्थात ‘बेबी बॉस’ने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. टीम इंडियत पाऊल ठेवण्यापूर्वी ‘इंडिया-ए’ संघाकडून खेळताना 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 11 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी करत अर्धशतक ठोकले आहे. विशेष म्हणजे या खेळी दरम्यान त्याने एकही धाव पळून काढली नाही. 450 च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या वैभवने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने हा विक्रम केला आहे.

इंडिया-ए आणि श्रीलंका-ए संघामध्ये तिरंगी मालिकेतील अंतिम सामना सुरू आहे. डंबुलाच्या रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या लढतीत यजमान श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम हिंदुस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र हा निर्णय श्रीलंकेच्या चांगलाच अंगलट आला. वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य या जोडीने हिंदुस्थानला दमदार सलामी दिली.

वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकापासून आपला दांडपट्टा सुरू केला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये हिंदुस्थानचे अर्धशतक फलकावर लागले. त्यावेळी वैभव 34, तर प्रियांश 15 धावांवर खेळत होता. यांतर चौथ्या षटकात वैभवने एकामागोमाग एक चौकार, षटकार ठोकत 11 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.

अर्धशतकानंतरही वैभवची बॅट आग ओकत होती. चौकार-षटकारांच्या मदतीने 64 धावा चोपल्यानंतर 65 वी धाव त्याने सिंगल घेतली. दुसरीकडे प्रियांशही आपल्या बॅटची जादू दाखवत होता. दोघांनी मिळून सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संघाचे शतक फलकावर लावले. यानंतरही वैभवची तोडफोड फलंदाजी सुरूच होती. मात्र नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 29 चेंडूत 94 धावा ठोकल्या. या खेळी दरम्यान त्याने 10 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार ठोकले.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतकं ठोकणारे फलंदाज

  • वैभव सूर्यवंशी – 11 चेंडू (2026)
  • के विररत्ने – 12 चेंडू (2005-06)
  • एनएलटीसी परेरा – 13 चेंडू (2020-21)
  • आर.के. क्लिनवेल्ड्ट – 14 चेंडू (2010-11)
  • एजे होलिओक – 15 चेंडू (1994)
  • सलमान बट – 15 चेंडू (2008-09)
  • परवेश हुसैन – 15 चेंडू (2024-25)
  • एनएस खान – 15 चेंडू (2025-26)

Comments are closed.