शतक हुकलं, पण इतिहास रचला! वैभवला डिवचणं श्रीलंकेला पडलं महाग; फायनलमध्ये केली गोलंदाजांची धुलाई!
‘बेबी बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ‘अ’ विरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने केवळ २९ चेंडूत ९४ धावांची धडाकेबाज खेळी केली. जरी तो अवघ्या सहा धावांनी शतक हुकला असला, तरी त्याच्या आक्रमक खेळाने सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले.
या खेळीदरम्यान वैभवने १० चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी केली. विशेष म्हणजे, त्याने अवघ्या ११ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ‘लिस्ट-ए’ (List-A) क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला.
वैभवच्या फलंदाजीची ताकद यावरून दिसून येते की, त्याने आपल्या सुरुवातीच्या ६४ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या होत्या; त्याची ६५ वी धाव ‘सिंगल’ होती. शतकाच्या दिशेने वाटचाल करतानाही त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला, परंतु अखेरीस श्रीलंका ‘अ’चा कर्णधार सहन अरचिगेच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन त्याची खेळी संपुष्टात आली.
अंतिम सामन्यापूर्वीच्या मालिकेत वैभवला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. श्रीलंकेविरुद्धच्या ‘सुपर ओव्हर’मध्येही तो अपयशी ठरला होता. त्या सामन्यात मैदानावर श्रीलंकन खेळाडूंसोबत बाचाबाची आणि धक्काबुक्कीचा प्रकारही घडला होता. मात्र, त्या रागाचा विचार करत बसण्याऐवजी वैभवने अंतिम सामन्यात आपल्या बॅटमधूनच चोख प्रत्युत्तर दिले.
या खेळीच्या माध्यमातून त्याने एक प्रकारे आपला वचपा काढला. शतक हुकल्याची खंत त्याला कदाचित वाटत असेल, तरी त्याच्या या स्फोटक फलंदाजीने आयर्लंड आणि इंग्लंडच्या संघांना आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर, वैभव आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. कारण त्याची इंग्लंड आणि आयर्लंडच्या आगामी दौऱ्यांसाठी निवड करण्यात आली आहे.
Comments are closed.