पाण्याचा अपव्यय केल्यास 10 हजारांचा दंड; पालिका प्रशासनाचे कठोर पाऊल
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने कडक नियमावली जाहीर केली असून, उल्लंघन करणाऱ्यांवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दोन वेळा दंडात्मक कारवाई होऊनही तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हवामान विभागाच्या सुधारित दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा देशात नियमित पाऊस पडण्याची शक्यता अवघी १४ टक्के आहे, तर सरासरीपेक्षा ९० टक्क्यांहून कमी पाऊस पडण्याची शक्यता तब्बल ६० टक्के वर्तवण्यात आली आहे. ‘एल-निनो’च्या संभाव्य प्रतिकूल प्रभावामुळे उद्भवू शकणारे पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले. नव्या नियमानुसार पाणीकपातीच्या काळात शहरातील सर्व खासगी आणि सार्वजनिक वॉशिंग सेंटर्स आणि स्विमिंग पूल बंद राहतील. तसेच उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास सक्त बंदी असेल. नियम मोडल्यास १० हजार दंड आकारला जाईल.
असे असतील नियम व दंडाची तरतूद
बांधकामांवर निर्बंध – रस्तेदुरुस्ती किंवा बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. यासाठी एसटीपी, विहीर, बोअरवेलचे पाणी वापरणे बंधनकारक.
ओव्हरफ्लो पाण्याच्या टाक्या – सोसायट्या किंवा इमारतींच्या पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया गेल्यास दंड वसूल केला जाईल. सोसायट्यांना फ्लशिंग व बागकामासाठी ‘एसटीपी’चे पाणी वापरणे बंधनकारक असेल. गाड्या धुणे, अंगण किंवा फुटपाथसाठी पिण्याचे किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्यास मनाई.
टँकरमधील गळती – पालिकेच्या पाण्याच्या टँकरमधून गळती होत असल्यास टँकरमालकांवर दंड, अनधिकृत नळजोडांवर थेट कायदेशीर कारवाई.
Comments are closed.