Devrukh News – दाभोळ्यासह परिसरात पावसाचे आगमन; बळीराजाला मोठा दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या दाभोळे आणि परिसरातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे.आज पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून भीषण उन्हामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या भात रोपांना जीवदान मिळणार आहे.
जून महिन्याचा तिसरा आठवा उलटला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.अनेक शेतकऱ्यांनी भाताची पेरणी पूर्ण केली होती. जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे भाताच्या कोंबांची वाढ खुंटली होती. कडक उन्हामुळे ही कोवळी रोपे करपण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.
केवळ शेतीच नव्हे, तर पावसाळा लांबल्यामुळे परिसरात पिण्याच्या पाण्याचीही कमतरता जाणवू लागली होती. आजच्या पावसामुळे नक्कीच अशा निर्माण झाली आहे की पाऊस काही दिवसात नक्कीच सक्रिय होईल.जर हा पाऊस असाच नियमित बरसत राहिला, तर परिसरातील जलस्त्रोत पुन्हा भरून पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
पावसाच्या या लांबलेल्या आगमनामुळे शेतीच्या कामांचे वेळापत्रक सुमारे महिनाभर मागे पडले आहे. पेरणीनंतरच्या पुढील महत्त्वाच्या कामांसाठी आता पावसाने अशीच साथ दिली, तरच खरिपाचा हंगाम यशस्वी होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.आजच्या पावसामुळे दाभोळे परिसरातील वातावरणातही काहीसा सुखद गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
Comments are closed.