तीन स्वदेशी युद्धनौका नौदलात सामील.
‘स्वदेशी’ सागरी ताकद भक्कम : आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक, आयएनएस अग्रय यांचे जलावतरण
वृत्तसंस्था/ कोलकाता
आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि पाणबुडीविरोधी आयएनएस अग्रय या तीन स्वदेशी युद्धनौकांचा रविवारी भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. या युद्धनौकांची रचना आणि निर्मिती स्वदेशी बनावटीची असून त्यांच्या जलावतरणामुळे भारताची समुद्री ताकद वाढली आहे. आयएनएस संशोधक 12,000 किमीपर्यंत सतत प्रवास करू शकते. आयएनएस दुनागिरी आठ ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. तर, आयएनएस अग्रया भारतीय किनारपट्टीजवळ शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करू शकते.
पश्चिम बंगालमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिन्ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी या युद्धनौकांचा नौदलातील समावेश हीच नव्या भारताची सर्वात मोठी ताकद असल्याचे नमूद केले आहे. आज भारताला संरक्षण क्षेत्रात केवळ एक खरेदीदार म्हणून राहायचे नसून लष्करी शक्ती दाखवून द्यावयाची आहे. आपल्या सामर्थ्याची ओळख जागतिक बाजारपेठ बनण्यात नसून आत्मनिर्भरतेत असल्याचेही त्यांनी सांगितले. आता नव्याने दाखल झालेल्या युद्धनौका केवळ जहाजे नसून, तरंगते लष्करी तळ असल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला आहे.
आयएनएस दुनागिरी : ब्रह्मोससारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस दुनागिरी ही प्रोजेक्ट 17ए अंतर्गत पाचवी स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका आहे. तिची रचना नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने केली होती. तिचे उत्पादन कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने (जीआरएसई) केले. ‘दुनागिरी’ ही पूर्व नौदल कमांड आणि पूर्व ताफ्याचा भाग असेल, असे जहाजाच्या कमांडिंग ऑफिसर कॅप्टन दिव्या आलोक यांनी सांगितले.
आयएनएस संशोधक : ही युद्धनौका समुद्राचे नकाशे तयार करेल आणि सर्वेक्षण करेल. आयएनएस संशोधक ही सर्व्हे व्हेसल (लार्ज) मालिकेतील चौथी नौका आहे. तिचे ध्येय युद्ध लढणे नसून, समुद्राचे सर्वेक्षण करणे हे आहे. ही युद्धनौका किनारी आणि खोल समुद्रातील जलसर्वेक्षण, सागरी माहिती संकलन, तसेच संरक्षण आणि नागरी वापरासाठी तयार करण्यात आले आहे. बंदरे आणि सागरी मार्गांचे सर्वेक्षण करणे हे देखील त्याचे प्राथमिक कार्य आहे.
आयएनएस अग्रय : ही युद्धनौका शत्रूच्या पाणबुड्या शोधून नष्ट करेल.
आयएनएस अग्रय ही अर्नाळा वर्गातील चौथी पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे. ती हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि प्रगत सोनार प्रणालीने सुसज्ज असल्यामुळे सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधून त्यांना लक्ष्य करू शकते.
भारतीय नौदलात 140 ते 145 युद्धनौका
भारतीय नौदलाकडे सध्या अंदाजे 140 ते 145 कार्यरत युद्धनौका आहेत. 2030 पर्यंत जहाजांची एकूण संख्या 150 ते 160 पर्यंत वाढवणे हे नौदलाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारत प्रामुख्याने या युद्धनौका तीन नौदल कमांड आणि एका सामरिक द्वीप कमांडमध्ये तैनात करतो. विशाखापट्टणम (पूर्व कमांड) येथील जहाजे बंगालच्या उपसागरात आणि मलाक्का सामुद्रधुनीमध्ये चीनची नाकेबंदी करतात. मुंबई आणि कारवार (पश्चिम कमांड) येथील युद्धनौका पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी आणि व्यापारी जहाजांचे चाच्यांपासून संरक्षण करण्यासाठी अरबी समुद्रात चोवीस तास तैनात असतात. याशिवाय, समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अंदमान आणि निकोबार कमांडमध्ये तैनात असलेल्या नौका शत्रूचा प्रवेश पूर्णपणे रोखतात. आधुनिक नौदल युद्धात युद्धनौकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे, कारण 90 टक्के जागतिक व्यापार सागरी मार्गांनी होतो.
Comments are closed.