रडारवर अभिषेक बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी.
सुमित रॉय यांच्याविरोधात फसवणूक आणि बनावटगिरीचा नवा गुन्हा दाखल
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सुमित रॉय यांच्या अडचणी वाढतच आहेत. पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदनापूर जिह्यात त्यांच्या विरोधात फसवणूक आणि बनावटगिरीचा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रविवारी याला दुजोरा दिला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुमित रॉय हे यापूर्वीच जमीन बळकावण्याच्या एका कथित प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणात त्यांचा शोध सुरू असून पश्चिम बंगाल पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली आहे. रॉय गेल्या काही काळापासून फरार असल्याचे वृत्त आहे.
पश्चिम बंगाल सीआयडीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी सुमित रॉय यांच्याविरोधात एका कथित जमीन घोटाळा प्रकरणात यापूर्वीच लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ते अनेक दिवसांपासून फरार असून पोलीस वॉरंट जारी होऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सुमित रॉयने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्याच्या वकिलाने हे प्रकरण न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवले आहे.
Comments are closed.