ग्रामपंचायत स्तरावर हमी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती : पाच सदस्यांचा असणार समावेश
टी. भा. प्रतिनिधी
बेंगळूर
आगामी दिवसांत प्रत्येक ग्रामपंचायत आणि वॉर्ड पातळीवर पाच सदस्यीय गॅरंटी समिती स्थापन केली जाईल. या समितीच्या सदस्यांनी गॅरंटी योजनांच्या लाभार्थ्यांच्या नोंदींचा आढावा घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले. बेंगळुरातील राजवाडा मैदानावर रविवारी झालेल्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिवकुमार पुढे म्हणाले, गेल्या सहा वर्षांत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत कठोर परिश्र्रम घेतले आहेत. सर्व आमदार व नेत्यांनी आपला वेळ, शक्ती आणि पैसा समर्पित करून मला बळ दिले आहे. इतक्मया लोकांना संधी देणे शक्मय झालेले नाही. आम्ही गॅरंटी योजना समिती स्थापन करून हजारो कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. मी आणि माझ्या वरिष्ठांनी पंचायत आणि वॉर्ड पातळीवर समिती स्थापन करण्याबाबत चर्चा केली आहे. या समितीत सर्व वर्गातील कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
प्रत्येक वॉर्ड आणि पंचायतीत पाचप्रमाणे 7 हजार पंचायती आणि 4,000 वॉर्डांमध्ये गॅरंटी समिती स्थापन केल्या जातील. यातून आपण किती नेते तयार करत आहोत याचा तुम्हीच विचार करा. नेत्याने नेते घडवले पाहिजेत, अनुयायी नाही, यावर काँग्रेस पक्ष ठाम आहे, असेही शिवकुमार म्हणाले.
मुख्यमंत्री असलो तरी मी कार्यकर्ताच
संपूर्ण सरकार आणि पक्ष नूतन प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्यासोबत असेल. मी मुख्यमंत्री झालो तरी तुमच्यासोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करेन. 2028 मध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचा आणि 2029 मध्ये राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान बनवण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वर्षापासून विद्यार्थी निवडणुका
येत्या काही दिवसांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयांमधील विद्यार्थी नेत्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाईल. यातून पंचायतींपासून ते संसदेपर्यंतचे नेते तयार होतील. या वर्षापासून विद्यार्थी निवडणुका घेतल्या जातील. महिलांसाठी आरक्षण टाळता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी संघटना आणि महिला संघटना अधिक संघटित झाल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
Comments are closed.