नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत ख
नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल 2026: राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर अत्यंत धक्कादायक उलटफेर झाला आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याची केवळ चर्चा असलेल्या आणि भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी महायुतीचे (Mahayuti) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करत गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय संपादित केला आहे. या पराभवामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: गोकुळ गीतेंना 357 मते
या निवडणुकीत एकूण 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान यातील 13 मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण 605 मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
एकूण 4 टेबलांवर (4 Tables) पार पडलेल्या या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मते मिळवता आली. दुसऱ्या बाजूला, निवडणुकीच्या रिंगणात असलेले आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली. पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी 303 चा कोटा पार केल्यामुळे त्यांनी पहिल्याच फेरीत हा खेळ संपवला.
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: सकाळी झाला होता अभूतपूर्व गोंधळ
प्रत्यक्ष निकालापूर्वी आज मतमोजणी केंद्रावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला होता. गोकुळ गीते यांनी मतमोजणी कक्षात पोहोचताच नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कोणत्याही विद्यमान लोकप्रतिनिधीला मतमोजणी कक्षात प्रतिनिधी म्हणून बसता येत नाही, असा मुद्दा मांडत गीतेंनी वकिलांना पाचारण केले होते.
या मुद्द्यावरून मतमोजणी कक्षातच गीते आणि दराडे यांचे समर्थक आमनेसामने आले होते आणि त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. या गोंधळानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन शंका निरसन केले आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया सुरू ठेवली.
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: छुप्या मतदानाचा संशय खरा ठरला
महायुतीच्या नेत्यांना पहिल्या दिवसापासून ज्या छुप्या मतदानाचा संशय होता, तो आज निकालातून पूर्णपणे खरा ठरल्याचे दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील संख्याबळानुसार भाजप आणि महायुतीचे पारडे जड असतानाही, बंडखोर गोकुळ गीते यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. ग्रामीण आणि शहरी भागातील महायुतीची मते फुटल्यामुळेच गोकुळ गीते यांचा हा एकतर्फी विजय सुकर झाला. “मी मतदारोंचा उद्रेक पाहिला होता, त्यामुळे मीच जिंकणार,” हा गोकुळ गीतेंचा दावा अखेर निकालाच्या दिवशी खरा ठरला आहे.
आणखी वाचा
विजय थलापथी: तामिळनाडू काँग्रेसने अभिनेता विजयसोबत हातमिळवणी केली
Comments are closed.