जयुकमार गोरेंनी दंड दाखवले; राऊतांच्या विजयानंतर मोहिते पाटलांना टोला, माळशिरसचंही सांगितलं

सोलापूर : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) 365 मतांनी विजयी झाल्यानंतर भाजप समर्थकांनी एकच जल्लोष केला. सोलापूरची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. कारण, सोलापूर विधानपरिषद बिनविरोध करण्यासाठी भाजप नेत्यांशी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे येथे निवडणूक लागली. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून वसंत देशमुख मैदानात उतरल्याचं दिसून आलं. त्यामुळे, येथे जयकुमार गोरे विरुद्ध मोहित पाटील असाच सामना रंगला होता. अखेर, भाजप विजयानंतर जयकुमार गोरेंनी दंड थोपटून मोहिते पाटलांवर टीका केली.

काही लोकांना इगो असतो, लोकांना गृहीत धरायची सवय असते, त्यापेक्षा अधिक बोलणं उचित नाही. अदृश्य शक्तीचे प्रयोग अनेकवेळा झाले, पण अशा शक्ती आता जिल्ह्यातून अदृश्य झाल्या आहेत, असे म्हणत जयकुमार गोरेंनी धैर्यशील मोहिते पाटलांना टोला लगावला. तसेच, राजेंद्र राऊत म्हणजे आमचा बाजीप्रभू, वेळ पडल्यावर खिंड लढवणारा अशा बाजीप्रभूसारख्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय देऊ शकलो याचा आनंद असल्याचं देखील जयकुमार गोरेंनी म्हटलं. तर, माळशिरसमध्ये राम सातपुते हाच आमचा नेता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषद निवडणुकीत माळशिरसमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी राजेंद्र राऊतांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर, जयकुमार गोरेंसोबत त्यांची जवळीक वाढल्याने येथून उत्तम जानकरांच्या आगामी नेतृत्वाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, उत्तम जानकर यांनी मदत केली आहे, त्याची आम्ही जाणीव ठेवू, पण माळशिरसमध्ये राम सातपुते हाच आमचा नेता आहे, माळशिरसमध्ये आमचा नेता हा भाजपचा कार्यकर्ता असलेला राम सातपुतेच आहे, असे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

अकलूजमध्ये सभा घेण्याची गरज नाही

काही लोकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला, अदृश्य शक्ती न्हणून ज्याचा उल्लेख केला अशी कुठलीही शक्ती कामाला आली नाही. शंभू महादेवाने देखील आम्हालाच आशीर्वाद दिलाय. या निवडणुकीत अनेकांनी साथ दिली, विकासाच्या मुद्यावरून हे सर्वजण आमच्यासोबत होते, असेही गोरेंनी म्हटले. सोलापूर जिल्ह्याने दाखवून दिलंय सरंजामशाही चालणार नाही, या विजयसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला नाही. त्यामुळे आता अकलूजमध्ये सभा घेण्याची गरज नाही. गॉगल घालणाऱ्यांचे राजकारण चालणार नाही, सध्या जमिनीवरचे राजकारण सुरू आहे. मला 501 मतं अपेक्षित होती, पण तेवढी मतं मिळाली नाहीत. तरीही, जेवढी मते मिळाली तेवढी कमी नाहीत, त्यामुळे आम्ही याचा आनंद साजरा करू, असेही गोरेंनी म्हटले. उघडा डोळे बघा नीट म्हणत आपण सर्वानीही साथ दिल्याचंही गोरेंनी म्हटलं.

राजेंद्र राऊतांचा पराभव मुख्यमंत्र्‍यांच्या जिव्हारी

राजेंद्र राऊत यांचा पराभव मुख्यमंत्री यांच्या जिव्हारी लागला होता, त्यामुळे राजाभाऊसारख्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो याचा आनंद आहे. ऑपरेशन टायगरबद्दल बोलताना ते म्हणाले, आम्हाला या विजयाचा आनंद घेऊ द्या, महायुती मध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागतचं करू

ओमराजे निंबाळकर दिल्लीला रवाना

खासदार ओमराजे निंबाळकर सोलापूर विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले आहेत. आज दुपारी कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी ओमराजे निंबाळकर दिल्लीला रवाना झाले असून कालच धाराशिवमध्ये त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार, आज ऑपरेशन टायगरमधील सर्वच 6 खासदार दिल्लीमध्ये असणार आहेत.

हेही वाचा

Video: ओमराजे निंबाळकर म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed.