प्रेग्नेंसीनंतर क्रिकेटमध्ये परतणाऱ्या महिला खेळाडूंसाठी आयसीसीचा मोठा निर्णय! मार्गदर्शक सूचना केल्या जारी
महिला क्रिकेटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे करियरच्या विविध संधीही उपलब्ध होत आहेत. अनेक खेळाडू आपल्या कारकिर्दीत कुटुंब सुरू करण्याचा आणि बाळाला जन्म दिल्यानंतर क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतात. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (२२ जून) महिला क्रिकेटपटूंसाठी गर्भधारणेनंतर खेळात परतण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आयसीसीने जारी केलेल्या या तत्त्वांमध्ये सदस्य मंडळांना गर्भधारणा, प्रसूती आणि उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये परत येण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी एक व्यापक आराखडा मांडण्यात आला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, क्रिकेट बोर्डांनी प्रत्येक खेळाडूसाठी एक मॅनेजर नियुक्त करावा, उपयुक्त प्रशिक्षण वातावरण, बालसंगोपन आणि प्रवासासाठी सहाय्य उपलब्ध करून द्यावे, तसेच गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरच्या संपूर्ण काळात वैद्यकीय आणि आरोग्य सेवांची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.
महिला क्रिकेटच्या वाढत्या व्यावसायिकतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यात अधिकाधिक खेळाडू आपल्या खेळण्याच्या कारकिर्दीतच कुटुंब सुरू करण्याचा पर्याय निवडत आहेत.
या आराखड्याच्या केंद्रस्थानी खेळात परत येण्याचे सहा टप्प्यांचे मॉडेल आहे; सज्जता, पुनरावलोकन, पुनर्स्थापना, पुन:स्थिती, पुनरागमन आणि सुधारणा.
वेस्ट इंडिजची ऍफी फ्लेचरने २०२१ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तिने या निर्णायाबाबत म्हटले, आयसीसी क्रिकेट बोर्डांना प्रेग्नंसीनंतर महिलांची काळजी घेण्यासाठी धोरणे आखत आहेत, ही एक चांगली बाब आहे. यामुळे तुम्हाला तुमचे कुटुंब वाढवण्याची आणि नंतर परत येण्याची संधी मिळते.
Comments are closed.