पुनीत बालन यांची ‘अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

तरुण उद्योजक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रशासक पुनीत बालन हे आता ‘अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ (AKFI) चे नवीन अध्यक्ष असतील. त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यासोबतच, फेडरेशनने 2026 ते 2030 या 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी आपल्या नव्या कार्यकारी समितीची घोषणा केली असून, यात देशातील विविध राज्यांमधून 22 पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

AKFI च्या या नव्या समितीची निवडणूक झारखंडमधील रांची येथे रविवारी पार पडली, ज्यासाठी 22 राज्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. या सर्वांनी महाराष्ट्रातील उद्योजक आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारे पुनीत बालन यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब केले.

या नवीन समितीत विदर्भाचे माजी खासदार रामदास तडस यांची ‘अध्यक्ष एमेरिटस’ (खेळ जगतातील मानद अध्यक्ष) म्हणून तर बिहारच्या राजकुमार सिंग यांची ‘मुख्य संरक्षक’ म्हणून नियुक्ती झाली आहे. सरचिटणीसपदाची जबाबदारी तेलंगणाच्या उशी रेड्डी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कार्यकारिणीतील इतरही प्रमुख पदांवर वेगवेगळ्या राज्यातील प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे देखरेख हायकोर्टाचे माजी न्यायाधीश रत्नाकर भेंग्रा यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केली, तर निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंकज श्रीवास्तव यांनी त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मदत केली.

याप्रसंगी फेडरेशनचे अरुण सिंग, डॉ. राजेश गुप्ता, विवेक रेड्डी, राहुल सिंग, चेतन गोविंद झा, राजेश सिंग, मनोज शर्मा, कुणाल एम. त्रिपाठी, सामी सिंग, सुजल केशरी आणि प्रदीप तिर्की यांसारखे अनेक अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा विश्वातील उपक्रमांना नेहमीच खंबीर साथ देणारे पुनीत बालन हे आपल्या कार्यकाळात भारतीय कबड्डीला एका नव्या उंचीवर आणि गतीवर घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

या प्रसंगी पुनीत बालन त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “माझ्यावर अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाची ही मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल मी देशातील सर्व राज्य संघटनांचा आणि पदाधिकाऱ्यांचा अत्यंत आभारी आहे. कबड्डी हा आपला पारंपरिक खेळ असून तो थेट सर्वसामान्यांच्या मनाशी जोडला गेला आहे. या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकट करणे, ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, आधुनिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा तयार करणे आणि तरुण व महिला खेळाडूंना पुढे आणणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. सर्व पदाधिकारी आणि राज्य संघटनांना सोबत घेऊन आम्ही भारतीय कबड्डीच्या विकासासाठी कटिबद्ध राहू आणि जागतिक पातळीवर देशाचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करू.”

Comments are closed.