धक्कादायक! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकालाच संपवलं, केजमध्ये तणाव

बीड क्राईम न्यूज : भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडली आहे. विलास घुले असे मृत हॉटेल चालकाचे नाव आहे.  अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान काल दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केज परिसरात तणाव निर्माण झाला असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

दरम्यान, या प्रकरणात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान उर्वरित आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी देखील बीड केज राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. घटना 20 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कदमवाडी फाट्यावरील ‘हॉटेल गावकरी’समोर घडली. हॉटेल चालक विलास घुले, आकाश चाळक, उमेश माने आणि स्वयंपाकी गणेश शुक्ला हे हॉटेलवर बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड आणि त्यांचे इतर नातेवाईक तेथे आले. अनैतिक संबंधाच्या संशयावरून बाबासाहेब कदम यांनी उमेश माने याला मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या दिशेने पळाला, त्याला वाचवण्यासाठी नितीन घुले आणि हॉटेल मालक विलास घुले हे देखील त्याच्या मागे धावले.

नऊ जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड,अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम यांनी रेणु बारसमोरील बंद समर्थ बिअर बारजवळ नितीन आणि विलास घुले यांना अडवले. सर्वांनी मिळून विलास घुले यांना मारहाण सुरू केली. याच वेळी बाबासाहेब कदम यांनी सोबत आणलेला चाकू काढून नितीन घुले यांच्या डोळ्यासमोरच विलास घुले यांच्या पोटात खुपसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलास घुले यांना तात्काळ केज येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर संतप्त नातेवाईक व स्थानिकांनी केज पोलीस स्टेशनसमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या देत आंदोलन केले. दरम्यान रस्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.

Comments are closed.