महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीचा ऐतिहासिक निर्णय; आता मातृत्व आणि खेळ दोन्ही एकत्र सांभाळता येणार!
आयसीसीने महिला क्रिकेटच्या इतिहासात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटपटूंना मातृत्वानंतर पुन्हा व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं अधिक सुलभ व्हावं यासाठी आयसीसीने (ICC) ‘रिटर्न टू प्ले पोस्ट-प्रेग्नन्सी गाईडलाइन्स’ जाहीर केल्या आहेत. संशोधन आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे प्रसूतीनंतर महिला खेळाडूंना सुरक्षित, नियोजित आणि टप्प्याटप्प्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यास मदत केली जाणार आहे.
महिला क्रिकेटचं प्रस्थ वाढत असताना आणि करिअरच्या संधी तयार होत असताना अनेक महिला खेळाडू आपल्या कारकिर्दीदरम्यान मुल जन्माला घालण्याचा निर्णय घेतात. तसेच मातृत्वानंतर पुन्हा उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. या संपूर्ण प्रक्रियेला मदत करण्यासाठी आयसीसीने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून, महिला क्रिकेटच्या सातत्यपूर्ण विकासासोबतच खेळाडूंच्या आरोग्य आणि कल्याणासाठी असलेल्या व्यापक बांधिलकीचाही हा एक भाग आहे.
महिला क्रिकेटपटूंचे आरोग्य हे आयसीसीच्या महिला क्रिकेटविषयक धोरणातील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. महिला क्रिकेटचा विकास हा आयसीसीच्या सहा प्रमुख धोरणात्मक प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. याच दृष्टिकोनातून आयसीसीने ‘१००% क्रिकेट’ मोहिमेअंतर्गत महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांद्वारे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना माहिती देणं, जागरूकता वाढवणं आणि क्रीडा क्षेत्रात महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर खुलेपणाने चर्चा होण्यास प्रोत्साहन देणं, हा उद्देश आहे.
‘रिटर्न टू प्ले पोस्ट-प्रेग्नन्सी गाईडलाइन्स’ सदस्य देशांच्या क्रिकेट मंडळांना त्यांच्या स्थानिक कायद्यांनुसार गर्भधारणा आणि पुनरागमन धोरण तयार करण्यास मदत करतील. यामध्ये खेळाडूंच्या शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक गरजांचा विचार करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
महिला क्रिकेटपटूंना क्रिकेटमध्ये पुनरागमन करता यावं यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ‘6 आर फ्रेमवर्क’ मांडण्यात आलं आहे. यामध्ये रेडी (Ready), रिव्ह्यू (Review), रिस्टोर (Restore), रिकंडिशन (Recondition), रिटर्न (Return) आणि रिफाइन (Refine) या सहा टप्प्यांचा समावेश आहे.
या प्रक्रियेत बाळंतपणानंतरची सुरुवातीची शारीरिक रिकव्हरी, वैद्यकीय आणि आरोग्यविषयक तपासण्या, टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणाकडे पुनरागमन, क्रिकेटसाठी आवश्यक शारीरिक तयारी, स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन तसेच खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या वातावरणात दाखल झाल्यानंतर तिच्या आरोग्य आणि कामगिरीवर सातत्याने लक्ष ठेवणं अशा सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
Comments are closed.