सांगली साताऱ्यात मविआला संख्याबळापेक्षा 100 मतं जास्त पडली, विश्वजित कदम म्हणाले…

सांगली सातारा विधान परिषदेचा निकाल मुंबई : सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांचा पराभव झाला. महायुतीच्या फुटलेल्या मतांमुळं ही निवडणूक चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडे असलेल्या मतांपेक्षा त्यांना जवळपास 100 मतं अधिक मिळाल्यानं मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु आहेत. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धैर्यशील कदम यांना 595 मतं, अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली  तर 9 मतं बाद झाली. या मतदारसंघात मविआकडे 193 मतं होती, साधारणपणे जगताप यांना 100 मतं अधिक मिळाली.

काही गणित वेगळी असतात… : विश्वजित कदम

आमदार विश्वजित कदम म्हणाले की आकडेवारी स्पष्ट असताना आमच्या मित्र पक्षाने निवडणूक लढवली. मविआच्या उमेदवाराला महायुतीतील काहींनी पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत काही गणितं वेगळी असतात. सगळी गणितं आत्ता कशी सांगायची असं देखील ते म्हणाले. आमचा उमेदवार चांगला लढला, आम्ही पण लढलो. विरोधी पक्षाला धक्का देऊ शकलो यात समाधान असल्याचंही आमदार कदम म्हणाले.

ठाकरेंच्या फुटलेल्या शिवेसना खासदारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  कोणतं चिन्ह होतं, निवडून कुठून आलेत, पुन्हा खासदार व्हायचं असेल तर राजीनामा द्यावा, असा सल्ला देखील विश्वजित कदम यांनी दिला.

खासदार विशाल पाटील काय म्हणाले?

काँग्रेसनं मागच्या वेळेस ही जागा लढली होती. या निवडणुकीत 190-195 मतं पडणं अपेक्षित होतं मात्र 300 मतांच्या जवळपास मतं आम्हाला पडली. म्हणजेच सत्ता असताना लोकं त्यांच्यासोबत राहिली नाहीत, हे स्पष्ट होत असल्याचं खासदार विशाल पाटील म्हणाले.  सामान्य माणसात मोठा बदल होत असतो, सरकार अपयशी ठरले आहे.

आता 3-4 पक्ष एकत्र आले तरी 100 जागा येणार नाहीत. आम्ही एकसंघ राहिलो तर हे पुन्हा निवडून येऊ शकणार नाहीत, असं देखील विशाल पाटील यांनी म्हटलं.

खासदार फुटीवर विशाल पाटील काय म्हणाले?

काँग्रेस विरोधी पक्ष आहे आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत.  राष्ट्रीय पातळीवर छोटे पक्ष टिकू शकणार नाहीत. ही लोकं पुन्हा निवडून आली तरी लहान पक्षात राहतील की नाही याची शंका आहे.  ठाकरे 9 खासदारांसोबत जरी गेले असते तरी हाच प्रश्न निर्माण झाला असता. ते एक आयडिओलाॅजी घेत आमच्या सोबत लढले होते.  जनतेला माहिती नव्हतं का हे सत्तेत येणार नाही तरी मतदान दिलं ना, खासदारांनी  जनतेशी प्रामाणिक राहिला पाहिजे होतं, असंही विशाल पाटील म्हणाले.

हेदेखील वाचा

Comments are closed.