शशी थरूर यांनी पुन्हा सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला.

जम्मू काश्मीरच्या विकासाची भलावण : काँग्रेसची नाराजी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आपल्या वक्तव्यामुळे काँग्रेस खासदार शशी थरूर पुन्हा एकदा स्वपक्षाच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. 21 जून रोजी श्रीनगर दौऱ्यावर असताना थरूर यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती.

त्यानंतर त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले मत मांडले. ‘आम्ही जम्मू काश्मीरमधील परिस्थिती आणि त्यात होत असलेल्या सुधारणेवर चर्चा केली. आव्हाने अजूनही आहेत, पण या दौऱ्यानंतर काश्मीर मला पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक वाटत आहे,’ असे ट्विट थरूर यांनी केले. थरूर यांच्या या पोस्टमुळे काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘राज्यातील खरी परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी थरूर यांनी काश्मीरच्या लोकांनाही भेटायला हवे होते, असे जम्मू काश्मीर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रवींद्र शर्मा म्हणाले.

एकीकडे काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत असताना थरूर यांनी सरकारच्या योगदानाचे कौतुक केल्याने ते पुन्हा टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. भाजपने मात्र थरूर यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना काँग्रेसवर निशाणा साधला.

Comments are closed.