अमेरिकेत जनरल मोटर्सच्या प्रकल्पात 50 रोबोट्सची एन्ट्री, हजारो नोकऱ्यांवर गंडांतर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्स (जीएम) ने मिशिगनमधील आपल्या ‘फॅक्टरी झिरो’ प्रकल्पात 50 सहयोगी रोबोट्स (कोबोट्स) तैनात केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या रोबोट्सच्या वापरामुळे प्लांटमधील हजारांहून अधिक कामगारांच्या नोकऱ्यांवर गंडातर आले आहे. असा आरोप आता कामगार संघटनांनी केला आहे. याआधी मे 2026 मध्ये जीएमने आपल्या आयटी विभागातील 600 हून अधिक अभियंत्यांना कामावरून कमी केले होते. त्यानंतर आता उत्पादन प्रक्रियेत स्वयंचलन वाढवण्याच्या निर्णयामुळे कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे.

ऑटोब्लॉगने दिलेल्या अहवालानुसार, ‘कोबोट्स’ म्हणून ओळखले जाणारे हे रोबोट्स वाहनांना बॉडी पॅनेल्स जोडणे यांसारख्या कामांमध्ये मानवी कर्मचाऱ्यांना मदत करत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या अपेक्षेपेक्षा कमी मागणीमुळे जीएम उत्पादन खर्च कमी करण्याचा आणि कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचे प्रवक्ते केविन केली यांनी सांगितले की, हे रोबोट्स कामगारांची जागा घेण्यासाठी नव्हे तर त्यांना सहाय्य करण्यासाठी आणले आहेत. यावर अधिक बोलताना ते म्हणाले, “आमच्या उत्पादन प्रक्रियेत अधिक प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. फॅक्टरी झिरोमध्ये कोबोट्समुळे सुरक्षितता, कामातील सोय आणि उत्पादनातील लवचिकता वाढण्यास मदत होत आहे,”.
युनायटेड अाॅटो वर्कर्स या कामगार संघटनेने जीएमच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

संघटनेने रोबोट्सच्या स्थापनेविरोधात तक्रारीही दाखल केल्या आहेत. जीएमने सुरक्षितता वाढल्याचा दावा केला असला तरी त्याबाबतही युनियनने प्रश्न उपस्थित केले आहेत. यूएडब्ल्यूचे अध्यक्ष शाॅन फेन यांनी ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यामुळे कामगारांच्या हक्कांवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, उत्पादनक्षमता आणि नफा वाढत असताना त्याचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे 2028 मधील करार वाटाघाटींमध्ये ऑटोमेशनविरोधी अधिक मजबूत संरक्षणाची मागणी केली जाणार आहे. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडिया दैनिकाने दिले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या मंदावलेल्या मागणीचा सामना करत असतानाही जीएमने 2026 च्या पहिल्या तिमाहीत 4.25 अब्ज डॉलर्सचा नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्क्यांनी अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, जीएमसारख्या अनेक कंपन्या आता पारंपरिक आयटी आणि अभियांत्रिकी पदे कमी करून एआय, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात गुंतवणूक वाढवत आहेत. त्यामुळे भविष्यात उद्योग क्षेत्रात ‘मानव विरुद्ध मशीन’ हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.