टीम इंडिया सावधान! इंग्लंडने अचानक खेळली मोठी चाल, संघात 'या' मिस्ट्री खेळाडूची एंट्री

भारतासोबत होणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी इंग्लंडने १७ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. हॅरी ब्रूक या संघाचे नेतृत्व करेल. या संघातील सर्वात लक्षवेधी नाव म्हणजे अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्स. ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप पदार्पण केलेले नाही, पण त्याला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात बोलावण्यात आले आहे. २२ वर्षीय कोल्सने ससेक्स आणि विविध देशांतर्गत लीगमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर संघात आपले स्थान मिळवले. आपल्या ७१ सामन्यांच्या टी२० कारकिर्दीत त्याने २८.६० च्या सरासरीने १,३७३ धावा केल्या आहेत आणि ८.२७ च्या इकॉनॉमी रेटने ५३ बळी घेतले आहेत

ग्लामोर्गनविरुद्धच्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात ससेक्ससाठी नाबाद २२४ धावांची प्रचंड खेळी करून कोल्सने आपल्या निवडीचा दावा अधिक बळकट केला. राष्ट्रीय निवडकर्ता मार्कस नॉर्थ यांनी कोल्सचे कौतुक करताना सांगितले की, या तरुण खेळाडूने गेल्या १२ महिन्यांत विविध फॉरमॅट्स आणि स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याला ही संधी मिळाली आहे.

हा संघ युवा ऊर्जा आणि अनुभव यांचा उत्तम समतोल साधणारा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी२० विश्वचषकातून वगळले गेलेले जॉर्डन कॉक्स, सोनी बेकर आणि साकिब महमूद यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, दुखापतीमुळे ब्रायडन कार्स आणि जेमी ओव्हरटन या मालिकेत खेळू शकणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे संघाचा समतोल आणि खोली राखण्यासाठी काही बदल करणे आवश्यक ठरले आहे.

गोलंदाजी आणि फलंदाजीची बाजू बळकट करण्यासाठी जोफ्रा आर्चर आणि सॅम करन यांसारखे स्टार खेळाडू संघात आहेत. यष्टिरक्षण आणि वरच्या फळीतील फलंदाजीसाठी जोस बटलर, फिल सॉल्ट आणि टॉम बँटन हे पर्याय उपलब्ध असतील. त्याच वेळी, फिरकी गोलंदाजीची धुरा रेहान अहमद, आदिल रशीद आणि लियाम डॉसन सांभाळतील, ज्यांना अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स आणि जेकब बेथेल यांची साथ मिळेल.

भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मालिका: वेळापत्रक

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही पाच सामन्यांची मालिका १ जुलै रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे सुरू होईल. त्यानंतरचे सामने मँचेस्टर (४ जुलै), नॉटिंगहॅम (७ जुलै) आणि ब्रिस्टल (९ जुलै) येथे खेळवले जातील, तर मालिकेचा समारोप ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथील युटिलिटा बाउल येथे होईल.

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-

हॅरी ब्रूक (कर्ंधर), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सनी बेकर, टॉम बंटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम कुरन, लियाम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टोंग, ल्यूक वुड.

Comments are closed.