Meta मध्ये AI साठी डेटा गोळा करताना मोठी चूक; हजारो कर्मचाऱ्यांची माहिती उघड
मेटाने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या संगणकांवर स्थापित केलेला ट्रॅकिंग कार्यक्रम सध्या स्थगित केला आहे. कंपनीने हा कार्यक्रम AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केला होता. मात्र, या प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांचा संवेदनशील डेटा कंपनीतील अनेकांसाठी उपलब्ध राहिल्याचे समोर आल्यानंतर वादंग निर्माण झाला आहे. ‘मॉडेल कॅपॅबिलिटी इनिशिएटिव्ह’ (MCI) या नावाने एप्रिलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांच्या माऊसच्या हालचाली, क्लिक, कीस्ट्रोक आणि वेळोवेळी घेतलेले स्क्रीनशॉट संकलित केले जात होते. कंपनीच्या मते, AI प्रणालींना प्रत्यक्ष कामकाजातील मानवी वर्तन समजण्यासाठी हा डेटा आवश्यक होता.
अहवालानुसार सुमारे 45 हजार डेटा टेबल्समधील माहिती चुकीच्या पद्धतीने उपलब्ध ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रॉम्प्ट्स, ट्रान्सक्रिप्ट्स, खासगी संवाद तसेच कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भातील माहितीचा समावेश होता. या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू असून कंपनीने याला गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले आहे. मेटाच्या प्रवक्त्या ट्रेसी क्लेटाॅन यांनी कंपनी तपास करत असल्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याने या डेटाचा गैरवापर केल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत. दरम्यान, या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांचा विरोध होता. 1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांनी एका अंतर्गत याचिकेद्वारे अशा प्रकारच्या डेटा संकलनामुळे सुरक्षा आणि गोपनीयतेचे धोके वाढतील, असा इशारा दिला होता. सुरुवातीला या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा पर्याय नव्हता. नंतर कंपनीने काही प्रमाणात सवलती जाहीर केल्या होत्या. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
मार्क झुकरबर्ग यांनी या उपक्रमाचे समर्थन करताना AI प्रणालींना कुशल कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतींमधून शिकण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मात्र, कर्मचारी कपात आणि AI-केंद्रित पुनर्रचनेमुळे आधीच अस्वस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे नाराजी वाढली. सध्या MCI कार्यक्रम स्थगित करण्यात आला असला तरी AI विकासासाठी डेटा संकलन आणि ऑटोमेशनवरील मेटाचा भर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कार्यक्रम भविष्यात सुधारित स्वरूपात पुन्हा सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.