फेकनाथ मिंधे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि सदनातून पळायचा प्रयत्न करतात; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

भाजपची गुलामी करणारे कधीही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेऊ शकत नाहीत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच फेकनाथ मिंधे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि सदनातून पळायचा प्रयत्न करतात असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.

विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज आम्ही विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. मिंधे सरकारपासून एक नवीन प्रथा सुरू झाली आहे. अकार्यक्षम असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही. राज्यमंत्री असून इतर व्यक्तीला ते खातं दिलं जातं आणि ठराविक अधिवेशन मंत्री नेमले जातात. एका बाजूला मुख्यमंत्री सदनात उत्तरं देतात. इतर मंत्रीही सदनात उत्तरं देतात, कधीकधी त्यांची कोंडीही होते. एक मंत्री जे अकार्यक्षम आहे, त्यांना आपल्या खात्याचा कारभार सांभाळता येत नाही, ते फेकनाथ मिंधे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि सदनातून पळायचा प्रयत्न करतात. आज आम्ही याबाबत आक्षेप घेतला होता. 2019-2020 साली काय झालं हे सांगितलं जातं. पण तेव्हा असे काहीही झालेले नव्हते. जिथे जिथे आमचे राज्यमंत्री होते तिथे तिथे त्यांनी उत्तर दिले, आणि आम्हीही उत्तर दिले. पण जबाबदारी स्विकारून आम्ही त्यावेळी उत्तर दिले होते. म्हणून आमच्या दोन गोष्टींवर हरकती आहेत. पहिली बाब अशी की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतःच्या खात्याची जबाबदारी घेऊन त्याची उत्तरं सदनात द्यावीत. दुसरी बाब म्हणजे अध्यक्षांनी सांगितले की 2019-20 सालीही असे होत होते, ही बाब खोटी आहे. ते रेकॉर्डमधून काढून टाकावे. अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडे राजकारण करू नये, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना आव्हान आहे की एक दिवस द्या, आम्ही त्यांच्या खात्याबद्दल प्रश्न विचारू त्यांनी उत्तर द्यावीत. फेकनाथ शिंदे हे भाजपचे गुलाम आहेत. ते भाजपलाच उत्तर देत असतात आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते उत्तर देत नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मिंधे गट बीकेसीमध्ये शिवसेना भवन उभारणार अशी बातमी होती. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की मिंध्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन करावा, उज्जैनमध्ये मोठा जमीन घोटाळा झाला आहे, त्यात त्यांना जमीन मिळेल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

विकाऊ खासदार हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांनी पैसे फेकले आणि ते नाचायला लागले आणि मिंधे गटात गेले. या खासदारांना निधी मिळूनही त्यांनी तो खर्च केलेला नाही. त्यांचा हा खोटारडेपणा समोर आलेला आहे. हे लोक वैयक्तिक निधी मागत होते, पक्षासाठी किंवा जनतेसाठी निधी मागत नव्हते.

आम्ही या नालायक लोकांना तिकिटं दिली, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर आणि भाजपच्या विरोधात हे लोक निवडून आले होते. त्यामुळे आम्ही आमच्या मतदारांची माफी मागितली. मिंधे गटात गेलेल्या खासदारांनी मिंध्यांकडून मिळालेला निधी वापरावा आणि भाजपच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी. ताबडतोब राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवून दाखवावी.

भाजपची गुलामी करणारे कधीही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेऊ शकत नाहीत, हेच लोक सूरत, गुवाहाटीला पळून गेले होते. मिंधे गटाचे किरण पावसकर म्हणाले त्यांना शिवसैनिक चांगलेच उत्तर देईल याची मला खात्री आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.

Comments are closed.