प्रलोभनांना बळी पडून स्वतःला विकले, गद्दार खासदारांवर अंबादास दानवे यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अंबादास दानवे यांनी महागाई, शिवसेना भवन आणि शिंदे गटाच्या राजकारणावरून केंद्र सरकार तसेच शिंदे गटावर जोरदार टीका केली.
महागाईच्या मुद्द्यावर बोलताना दानवे म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले तेव्हा “बहुत हो गई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार” अशी घोषणा देण्यात आली होती. मात्र २०१४ ते २०२६ या कालावधीत महागाई सातत्याने वाढतच गेली. ५० ते ६० रुपयांदरम्यान असलेले पेट्रोल १०० रुपयांच्या पुढे गेले आहे. डिझेलच्या किमतीही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या असून घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ३५० रुपयांवरून एक हजार रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे आता “बहुत हो गई महंगाई की मार, अब हटा दो मोदी सरकार” असे म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. जनतेच्या या भावना व्यक्त करण्यासाठीच विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार आणि आमदारांच्या निधीच्या मुद्द्यावर बोलताना दानवे म्हणाले की, निधी हा मूळ प्रश्न नसून सत्तेचे आणि इतर प्रलोभनांचे राजकारण सुरू आहे. निधीचा किती वापर झाला आणि किती निधी मिळाला याची माहिती सार्वजनिक आहे. मात्र, काही लोक प्रलोभनांना बळी पडून पक्ष सोडून गेले असून त्यांनी स्वतःला विकून टाकल्याची टीका त्यांनी केली.
शिवसेना भवनाच्या मुद्द्यावर बोलताना दानवे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या शिवसेना भवनाला एक वेगळे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व आहे. शिवसेना भवन ही केवळ एक इमारत नसून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची साक्ष देणारे केंद्र आहे. त्या वास्तूशी अनेक परंपरा, संघर्ष आणि आठवणी जोडलेल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, पैशाच्या बळावर कितीही नवीन इमारती उभारल्या तरी त्यांची तुलना मूळ शिवसेना भवनाशी होऊ शकत नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेना भवनाची बरोबरी कोणी करू शकणार नाही.
शिवसेनेच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर बोलताना दानवे यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला. “जी शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भूमिका स्वीकारून त्यांच्यामागे चालते, ती खरी शिवसेना असू शकत नाही. ती भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेली एक राजकीय टीम आहे. तिचा वापर वेळेनुसार केला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे आणि महाराष्ट्रात तसेच देशात तीच खरी शिवसेना आहे,” असेही अंबादास दानवे म्हणाले.
Comments are closed.