किंग एडवर्ड कसाबसारखा अतिरेकी आहे का? KEM रुग्णालयाच्या नामांतरासाठी एवढा आटापिटा का? शिवसेनेचा महायुतीवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील सुप्रसिद्ध केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या मुद्यावरून विधान परिषदेत आज मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवला. ‘किंग एडवर्ड काय कसाबसारखा अतिरेकी आहे का?’ असा संतप्त सवाल करत शिवसेना नेत्यांनी नामांतराचा घाट घालण्याऐवजी रुग्णालयातील पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

किंग एडवर्ड काय जुना अतिरेकी कसाबसारखा आहे का? – मिलिंद नार्वेकर

विधान परिषदेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी थेट सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल म्हणजे केईएम. या रुग्णालयाचे नाव बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, तरीही त्यांना अंधारात ठेवून मागून कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटल, असे नामकरण करण्याचे काम सुरू आहे. या व्यक्तीवर कोणाचा एवढा राग आहे की नाव बदलायचा असा अट्टाहास केला जातोय? हा किंग एडवर्ड काय जुना अतिरेकी कसाबसारखा आहे का?”

देशात प्लेगची साथ आल्यानंतर ती रोखण्यासाठी किंग एडवर्ड यांनी हे रुग्णालय उभारले होते, याची आठवण करून देत नार्वेकर पुढे म्हणाले, “रुग्णालयाचे नाव कौशल्य एकलव्य स्मारक करून तुम्ही किंग एडवर्ड यांचा मान कसा राखणार? रुग्णालयात सध्या पायाभूत सुविधांची वानवा आहे, तिथे लक्ष देण्याऐवजी या व्यक्तीच्या नावाच्या मागे का लागला आहात?”

मंत्र्यांनी नामांतर होणार नाही हे आजच जाहीर करावे – सचिन अहिर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सचिन अहिर यांनीही या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला. रुग्णालयातील असुविधांकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, “सध्या केईएम रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. मार्ड सारख्या निवासी डॉक्टरांच्या संस्थेने देखील या नामांतराच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे आता नामांतराचा कोणाचाही प्रस्ताव आला तरी आम्ही तो मान्य करणार नाही, असे मंत्री महोदयांनी आजच सभागृहात जाहीर करावे.”

मुंबईकरांच्या मनातील संभ्रम दूर करा – अनिल परब

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार अनिल परब यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “आम्ही ३० दिवस आधीच प्रश्न दिलेले असतात, त्यामुळे त्यावर सविस्तर चर्चा होऊन मंत्री महोदयांकडून ठोस उत्तर येईल अशी आमची अपेक्षा असते. केईएम हे एक जगप्रसिद्ध रुग्णालय आहे आणि मुंबईकरांच्या भावना या रुग्णालयाशी तीव्रपणे जोडलेल्या आहेत. त्यामुळे मंत्री महोदयांनी या रुग्णालयाचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही, असे स्पष्टपणे जाहीर करावे आणि तमाम मुंबईकरांच्या मनातील प्रश्न व संभ्रम दूर करावा.”

Comments are closed.