स्वतःच्या खात्याची उत्तरे देता येत नाहीत, फोडाफोड उपमुख्यमंत्र्यांना फक्त रात्रीचे खेळ जमतात! आदित्य ठाकरे यांचा टोला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फोडाफोड उपमुख्यमंत्री एवढे अकार्यक्षम आहेत की, बाहेर त्यांना रात्रीचे खेळ, बाकीचे खेळ जमतात, पण साधे सभागृहात बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही. त्यांच्या खात्याचे नेहमी वाटप होते. उत्तर देता येत नसेल तर लिहून द्यावे, अशा शब्दांत शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.

पावसाळी अधिवेशनात स्वतःच्या खात्याचे कामकाज सांभाळून विधिमंडळातील कामकाज हाताळण्याबाबत व प्रश्नांना उत्तरे देण्याबाबत इतर मंत्र्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास व गृहनिर्माण खात्याचे कामकाज अधिवेशनापुरते उदय सामंत व शंभुराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यावर जयंत पाटील व विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. मंत्री उपस्थित असताना कामकाज दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संविधानात सामूहिक जबाबदारीचा उल्लेख आहे. मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री उत्तरासाठी जबाबदार असतो. त्यामुळे मुभा देता येते. ही प्रथा आता सुरू झालेली नाही. 2029 मध्ये आणि 2020मध्येही ही प्रथा होती असे नार्वेकर म्हणाले.

राहुल नार्वेकर यांच्या या विधानावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेतला. आदित्य ठाकरे संतप्त होऊन उभे राहिले 2019 आणि 2020मध्येही असे होत होते हे तुमचे वाक्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकायला पाहिजे, ही चुकीची माहिती आहे ती कामकाजातून काढून टाकावी. राज्यमंत्री असताना मंत्री उत्तर देऊ शकतो. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी सांगावे असा सणसणीत टोला त्यांनी मारला. त्यावर अध्यक्षांनी नियमानुसार कामाचे वाटप कसे योग्य आहे असे सांगितले. पण 2019 आणि 2020मधील प्रथेच्या संदर्भातील केलेली विधाने कामकाजातून काढण्यावर कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचे सर्व सदस्य संतप्त झाले. अध्यक्षांनी केलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून धरली, पण अध्यक्षांनी त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे विरोधी सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला.

विरोधकांचा सभात्याग

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही सभात्याग केला. कामकाजावर बहिष्कार टाकला. कारण एक नवीन प्रथा मिंधे सरकारच्या काळापासून सुरू झालेली आहे. फोडाफोड उपमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही. त्यांच्या खात्याचे नेहमी वाटप होते. राज्यमंत्री असतानादेखील इतर मंत्र्यांना त्यांच्या खात्याचे वाटप केले जाते. ठरावीक अधिवेशन मंत्री नेमले जातात असा टोला मारला.

Comments are closed.