कार्ले खिंडीत रस्त्याला सिमेंट पावडरचा मुलामा; एकाच दिवशी १६ अपघात, कंत्राटदाराचा बेफिकीरपणा; प्रशासनाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रस्त्यावर टाकलेल्या सिमेंट काँक्रीटच्या केमिकल लेअरमुळे आज अलिबागच्या कार्ले खिंडीत तब्बल १६ अपघात झाले. पावसामुळे हे केमिकल लेअर निसरडे झाले आणि एक एसटी बस, दोन टेम्पो तसेच जवळपास १२ दुचाकींची घसरगुंडी होऊन एकापाठोपाठ एक अपघात घडले. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंत्राटदाराच्या बेफिकीरपणा व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर काही काळ या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला.

अलिबाग तालुक्यातील सारळपुळे ते कार्ले खिंड या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीला हे काँक्रीटीकरणाचे काम मिळाले आहे. मात्र ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे सहा महिन्यांत जेमतेम एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. अनेक भागांत रस्ते खोदून खडी व त्यावर मजबुतीकरणासाठी केमिकल लेअर अंथरले आहे. या ‘गोगलगाई’ कामामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावर वाहतूककोंडी होत असताना आता कंत्राटदाराच्या बेपर्वाईमुळे अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अलिबागकरांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमके काय झाले?

काँक्रीटीकरण करण्यापूर्वी रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी खडी अंथरून त्यावर केमिकल पावडरचे लेअर टाकले जातात. परंतु पावसामुळे राडरोडा होऊन रस्ते निसरडे होतात. त्यामुळे कंत्राटदाराने हे लक्षात घेऊन केमिकल लेअर टाकलेल्या भागातील रस्त्याचे काम तातडीने करणे गरजेचे होते. परंतु तसे न केल्याने आज झालेल्या पावसाने कार्ले खिंडीजवळील जांभूळपाडा ते जलपाडादरम्यान रस्ते निसरडे झाले. एक एसटी बस, तीन टेम्पो घसरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या चिखलात रुतून बसले. त्यापाठोपाठ बारा दुचाकीदेखील भररस्त्यात आडव्या झाल्या. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे ही पावडर तात्काळ काढून रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Comments are closed.