लय भारी! फिफाच्या अधिकृत पेजवर मराठीत पोस्ट; जागतिक व्यासपीठावर मायबोलीचा गौरव
जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी प्रतिष्ठेचे असलेल्या FIFA World Cup 2026 च्या अधिकृत फेसबुक पेजवरून मराठीत पोस्ट करण्यात येत आहेत. लिओनल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या दमदार खेळानंतर फिफाच्या पेजवरून मराठीत पोस्ट करण्यात आल्याचे दिसून आले.
फिफा वर्ल्डकप हे जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक मानले जाते. या स्पर्धेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा वापर होणे ही महाराष्ट्रातील क्रीडा रसिकांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. फुटबॉलची लोकप्रियता हिंदुस्थानात वेगाने वाढत असून, स्थानिक भाषांमधून चाहत्यांशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
जगभरातील कोट्यवधी चाहत्यांपर्यंत पोहोचणाऱ्या फिफाच्या अधिकृत माध्यमातून मराठीला स्थान मिळाल्याने सोशल मीडियावरही याची चर्चा सुरू झाली आहे. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्कृती आणि ओळखीचा भाग असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
विशेष म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्येही आता मराठीत समालोचन करण्यात येत आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलचा महाकुंभ असणाऱ्या वर्ल्डकपच्या व्यासपीठावर मराठीला मिळालेले स्थान विशेष लक्ष वेधून घेत आहे. क्रीडा आणि भाषा यांचा सुंदर संगम घडवणारी ही बाब म्हणून याकडे पाहिले जात आहे.
Comments are closed.