प्रत्येक घरात असायलाच हवी एक आरामखुर्ची

पूर्वीच्या काळी घर लहान असो किंवा मोठं प्रत्येक घरात आरामखुर्ची ही असायचीच. कारण आराम खुर्ची ही केवळ फर्निचर नसून आराम, संवाद आणि मानसिक शांततेचे प्रतीक मानली जायची. त्यामुळे पूर्वीच्या घरांमध्ये घराच्या एका कोपऱ्यात आरामखुर्ची डौलाने उभी असायची. प्रामुख्याने घरातील प्रमुख व्यक्ती कामावरून , बाहेरून थकून भागून आली की फ्रेश झाल्यानंतर याच आरामखुर्चीत शांतपणे बसायची. याच खुर्चीत बसून मग कुटुंबाशी मुलांशी संवाद साधला जायचा. दिवसभराच्या घटना, गप्पा याबरोबरच मुलांच्या भविष्याचा विचार आणि सकाळचं पेपर वाचन ही याच खुर्चीवर पाठ टेकत व्यक्ती करायच्या. पण जसजसा काळ बदलला तसतशा सगळ्याच गोष्टी बदलल्या. माणस बदलली, गरजा , समस्याही बदलल्या, घरांचे आकारमान क्षेत्रफळात मोजले जाऊ लागले. मग घरही लहान बनू लागली. कुटुंब वेगवेगळी राहू लागली आणि मग घरातील ज्येष्ठांची हक्काची आराम खुर्चीही हद्दपार झाली.

घराच्या आकारमानानुसार फर्निचरच्या डिझाईनमद्येही अनेक बदल झाले. मग पौर्टेबल फर्निचरचा ट्रेंड आला. यात काही फर्निचरच्या डिझाईन लहान झाल्या. पण आराम खुर्चीला पर्याय मात्र आलेला नाही. रेक्लायनर चेयर नावाचा एक प्रकार आहे. पण त्यात खुर्ची मागे पुढे करण्याची पाय लांब करून बसण्याची सोय आहे. मात्र आराम खुर्चीचा फिल यात येत नाही. पण खरं तर आजच्या काळात या आराम खुर्चीची गरज प्रत्येकाला आहे.

आरामदायी आसन असलेली ही खुर्ची दिवसभराच्या कामानंतर आराम करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

वाचन आणि चिंतनासाठी जागा – वर्तमानपत्र वाचणे, पुस्तके वाचणे किंवा शांतपणे विचार करण्यासाठी आरामखुर्चीचा वापर करता येतो.

आरोग्यासाठी फायदेशीर – पाठीला आणि मानेला योग्य आधार मिळाल्याने शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते.

कौटुंबिक संवादाचे केंद्र – पूर्वीप्रमाणे घरातील वडीलधारी मंडळी आरामखुर्चीत बसून कुटुंबीयांशी गप्पा मारू शकता, अनुभव सांगू शकता.

दुपारच्या विश्रांतीसाठी उत्तम – पूर्ण झोप न घेता थोडा आराम करण्यासाठी ही खुर्ची योग्य आहे.

आज स्क्रीनसमोर दीर्घकाळ बसण्यामुळे शरीराबरोबरच मनही थकते . ते कमी करण्यासाठी आराम खुर्ची उत्तम पर्याय आहे.
वाचन, ध्यान किंवा छंद जोपासण्यासाठी आरामदायी कोपरा तयार करण्यासाठी आराम खुर्ची बेस्ट आहे.
आराम खुर्चीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि पाठदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींना अधिक आराम मिळतो.
आराम खुर्चीमुळे घरात शांतता आणि निवांतपणाची भावना निर्माण करण्यासाठी.

Comments are closed.