सरकारी रुग्णालयात जन्म घेतल्यास सोन्याची अंगठी – TMarathiNews
तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय : थलपति विजय यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत पहिल्यांदाच सत्तेवर आलेले थलपति विजय यांचे सरकार आता 15 सप्टेंबरपासून नवजात मुलांसाठी एक ग्रॅमची सोन्याची अंगठी गिफ्ट करणार आहे. परंतु हा निर्णय 22 जूनपासूनच अंमलात येणार आहे. हा निर्णय लागू करण्यासाठी सरकार एक राज्य कार्यक्रम व्यवस्थापन युनिट निर्माण करणार आहे. हे युनिट ‘थैमामन थंगा मोथिरम थिट्टम’ लागू करणे, त्यावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी असेल. याच्या माध्यमातून नवजातांसाठी एक ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री विजय या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत.
राज्यभरात सरकारी रुग्णालयांमध्ये जन्म घेणाऱ्या नवजातांना एक ग्रॅम सोन्याची अंगठी मिळणार आहे. या अंगठीचे मूल्य सध्याच्या मूल्यानुसार 13,600 रुपये असणार आहे. परिवारात मूलाच्या आगमनाच्या आनंदात थैमामन सीर (मामाकडून भेट)च्या सांस्कृतिक परंपरेनुसार ही योजना राबविली जाणार आहे. या सांस्कृतिक परंपरेत नवजाताचे स्वागत केले जाते आणि परिवाराला आशीर्वाद दिला जातो.
या योजनेद्वारे सरकार स्वत:च्या रुग्णालयांमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक नवजातासाठी मामाची भूमिका पार पाडणार आहे आणि स्वागताची खुण म्हणून एक सोन्याची अंगठी देईल असे सरकारच्या आदेशात म्हटले गेले आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार राज्यात दरवर्षी जवळपास 7.8 लाख प्रसूती होतात, यातील सरकारी रुग्णालयांध्ये जवळपास 4.2 लाख प्रसूती (53 टक्के) होत असतात. सरकारी रुग्णालयांमध्sय प्रत्येक प्रसूतीवर सरासरी येणारा खर्च केवळ 1,364 रुपये आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येक प्रसूतीवर हा आकडा 63,473 रुपये इतका आहे.
नवी योजना मुख्यमंत्री विजय यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणेची पूर्तता करणार आहे. राज्यात आमचे सरकार आल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला मामा म्हणून सोन्याची अंगठी गिफ्ट करणार असल्याचे विजय यांनी जाहीर केले होते.
दरवर्षी जवळपास 750 कोटी खर्च
सरकारी रुग्णालयांमध्ये जन्म घेणाऱ्या नवजातांना दिली जाणारी सोन्याची अंगठी कौतुक अन् स्मृतीचे प्रतीक आहे, जे मुलाच्या जन्माची आठवण आणि थाईमामन थंगा मोथिरम थिट्टमद्वारे आई होण्याचा आनंद आणि महत्त्वाचा जल्लोष करेल असे सरकारकडून जारी आदेशात म्हटले गेले आहे. तर विजय यांची ही योजना अधिकृतपणे 15 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. त्या दिवशी माजी मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई यांची जयंती आहे. परंतु ही योजना प्रत्यक्षात 22 जूनपासून लागू झाल्याचे मानण्यात येणार आहे. या नव्या योजनेसाठी 755.83 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
Comments are closed.