वंशिका आणि शिवाला रौप्यपदक.

10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धा

वृत्तसंस्था/ सुहल

वंशिका चौधरी आणि शिवा नरवाल या भारतीय जोडीने संयमित कामगिरी करत  येथे सुरु असलेल्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावले. या भारतीय जोडीने एकूण पदकसंख्या आता 16 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारतीय जोडीने एकूण 469.7 गुण मिळवत दुसरे स्थान घेतले. पोलंडच्या मोल्गोर्झाटा डाब्रोवस्का आणि इव्हान राकित्सस्की यांनी 471.9 गुणांसह सुवर्ण मिळवले. कांस्य पदक चायनीज तैपेईच्या संघाला मिळाले, ज्याचे प्रतिनिधित्व चेंग येन-चिंग आणि हिसएह सियांग-चेन यांनी केले आणि त्यांनी 410.0 गुण नोंदवले. मंगळवारी मिळालेल्या या रौप्य पदकासह भारताने स्पर्धेतील पदक तालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले. कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या या पाचव्या आवृत्तीत 70 फेडरेशन्सचे 800 हून अधिक नेमबाज सहभागी झाले आहेत आणि भारताने 84 सदस्यांचे पथक या स्पर्धेसाठी पाठवले होते. ही स्पर्धा 26 जूनपर्यंत चालणार आहे.

 

Comments are closed.