ट्रेनमध्ये धुम्रपान केल्याबद्दल दंड 20 पट वाढला.
रेल्वेतील फेरीवाल्यांना जावे लागणार तुरुंगात : भीक मागण्याचे प्रकार रोखले जाणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दरदिनी कोट्यावधी लोकांच्या प्रवासाची साक्षीदार ठरणारी भारतीय रेल्वे आता नवे बदल करत आहे. लोकांची सुविधा वाढविणे आणि त्यांच्या प्रवासाचा अनुभव चांगला करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नियमांना आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या लोकांवरील दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. रेल्वेत कुणी धूम्रपान करताना पकडला गेल्यास त्याच्यावर 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दंड न भरल्यास संबंधिताला न्यायालयासमोर हजर केले जाईल, जेथे कमाल दंडाची रक्कम 5 हजार रुपये आहे. धूम्रपान करणाऱ्यांसोबत मंत्रालयाने रेल्वेतील फिरते विक्रेते आणि भीग मागणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाईची तयारी केली आहे.
1 जुलैपासून भारतीय रेल्वेने प्रवाशांचा अनुभव चांगला करण्यासाठी अनेक मोठ्या बदलांची तयारी केली आहे. स्लीपर आणि जनरलने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हे बदल अत्यंत आरामदायी ठरतील.
धूम्रपानावर बंदी
सर्वसाधारणपणे भारतीय रेल्वे आणि रेल्वे परिसरांमध्ये धूम्रपानावर बंदी आहे. परंतु दंडाची रक्कम कमी असणे आणि शिथिलता असल्याने लोक यावर लक्ष देत नाहीत. याच शिथिलतेला दूर करण्यासाठी केंद्र सरकारने नवा नियम लागू केला आहे. जनविश्वास अधिनियम 2026 नुसार रेल्वे अधिनियमाचे कलम 167 (3) अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्dयांवर आता 100 रुपयांच्या जागी 2000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. म्हणजेच रेल्वे परिसर किंवा रेल्वेत धूम्रपान करताना पकडण्यात आल्यास संबंधिताला 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
याचबरोबर संबंधिताचे तिकीट जप्त केले जाईल आणि कुठलाही रेल्वे कर्मचारी त्याला रेल्वेमधून खाली उतरवू शकतो. संबंधिताने दंड भरण्यास नकार दिल्यास त्याला सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. तेथे दोष सिद्ध झाल्यास त्याच्यावर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई
रेल्वेमध्ये परवानाधारक विक्रेत्यांशिवाय अन्य लोकाही सामग्री विकण्यासाठी फिरत असतात. नव्या नियमांनुसार सरकारने या फिरत्या विक्रेत्यांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. जनविश्वास अधिनियमाचे कलम 144 अंतर्गत विनापरवाना रेल्वेत विक्री केल्यास 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यानंतरही आरोपीने दंड न भरल्यास त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. जेथे त्याच्यावर 5 हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या शिक्षेनंतरही आरोपी वारंवार रेल्वेत अवैध विक्री करत असल्यास त्याला एक वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जाऊ शकतो.
भिकाऱ्यांना रोखणार
भारतीय रेल्वेच्या नव्या नियमांनुसार कुठल्याही व्यक्तीला रेल्वे किंवा रेल्वे परिसरात भीक मागण्याची अनुमती नसेल. भीक मागताना कुणी आढळून आल्यास त्यालाही दंड अन् तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तर भारतीय रेल्वेचा कुठलाही कर्मचारी अशा व्यक्तीला रेल्वेतून खाली उतरवू शकतो.
विनातिकीट प्रवास केल्यास…
भारतीय रेल्वेच्या आकडेवारीनुसार दरदिनी मोठ्या संख्येत लोक विनातिकीट प्रवास करत असतात. यामुळे रेल्वेचा कोट्यावधीचे नुकसान होते, तर प्रवाशांनाही असुविधेला सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी मंत्रालयाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या लोकांवरील दंडाची रक्कम वाढवून दुप्पट केली आहे. आतापर्यंत ही रक्कम केवळ 250 रुपये होती, जी आता वाढून 500 रुपये होणार आहे.
Comments are closed.