खाजगी सोने खाण प्रकल्पाचे उद्घाटन
आंध्रप्रदेशातील प्रकल्प : 144 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अनुमान
न्यूजपेपर सोसायटी, कर्नूल
आंध्रप्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील जोंनागिरी भाग आता देशाच्या गोल्ड मॅपवर स्वत:ची खास ओळख निर्माण करणार आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्राच्या गोल्ड मायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. सुमारे 405 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाला जियो म्हैसूर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेडने मिळून विकसित केले आहे.
प्रकल्पाच्या अंतर्गत सोन्यावरील प्रक्रिया प्रकल्पाचे पहिले युनिट सुरू झाले आहे. तर दुसऱ्या युनिटसाठी पायाभरणी करण्यात आली आहे. खाण आणि प्रक्रिया प्रकल्पाची चाचणी पूर्ण झाली असून उद्घाटनंतर तेथे व्यावसायिक स्तरावर सोन्याचे उत्पादन सुरु होणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.
पहिल्या वर्षी 400 किलो सोने
जोनागिरी गोल्ड फील्ड्स प्रकल्पासाठी सरकारने 1500 एकरची जमीन उपलब्ध केली आहे. पहिल्या टप्प्यात 600 एकर क्षेत्रात खाणकार्य सुरू होईल, तर नंतर उर्वरित भागातही प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे. पहिल्या वर्षी या खाणीतून सुमारे 400 किलोग्रॅम सोने मिळेल अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षी हे प्रमाण वाढून 900 किलोग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. भविष्यात प्रक्रिया क्षमता वाढण्यासोबत हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 2 टन सोने उत्पादन करण्यास सक्षम होणार आहे.
मोठ्या प्रमाणात रोजगार
या प्रकल्पामुळे जवळपास 700 लोकांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्य सरकारला उत्पादित सोन्याच्या मूल्यावर 4 टक्के रॉयल्टी मिळणार आहे. 400 किलोग्रॅम उत्पादनावर सरकारला सुमारे 57 कोटी रुपये आणि 900 किलोग्रॅम उत्पादनावर जवळपास 144 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
सोन्याच्या खाणींचे प्रमुख केंद्र
आतापर्यंत भारतात सोन्याच्या खाणींची चर्चा मुख्यकरून कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्ड्सपर्यंत मर्यादित राहिली आहे. परंतु जोंनागिरी प्रकल्प सुरू झाल्यावर आंध्रप्रदेश देखील देशाच्या प्रमुख सोन्याच्या खाणींच्या केंद्रांमध्ये सामील झाले आहे.
आंध्रमध्ये सोन्याच्या खाणीची सुरुवात
?405 कोटी रुपये आहे प्रकल्पाचा एकूण खर्च
?900 किलो सोन्याच्या वार्षिक खननाचे लक्ष्य
?144 कोटी रुपयांची वार्षिक रॉयल्टीची अपेक्षा
Comments are closed.