विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक 11 वाहनांवर कारवाई, परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रातिनिधीक फोटो

सांगली शहर आणि जिल्ह्यात शाळकरी मुलांची अवैध व धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱया वाहनधारकांविरुद्ध तसेच अवैधरीत्या शालेय विद्यार्थी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात आली. या मोहिमेच्या अनुषंगाने सांगली शहर कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावर अवैध शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱया 11 वाहनांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.

अपुऱया कागदपत्रांसह नियमबाह्य अवैध शालेय विद्यार्थी वाहतूक करताना अधिक विद्यार्थी घेणे, सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा प्रकारे बेकायदेशीर वाहनाच्या विरोधामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने यापुढेही तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे.

मुलांचा शाळाप्रवास सुरक्षित ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर पालक आणि शाळांचीही संयुक्त जबाबदारी आहे. किरकोळ आर्थिक फायद्यासाठी किंवा सोयीसाठी मुलांच्या जिवाशी खेळ करू नये. वाहन अधिकृत आहे का तपासावे. आपल्या पाल्याला ज्या वाहनातून शाळेत पाठवता, त्या वाहनाला आरटीओचा ‘स्कूल बस’ म्हणून अधिकृत परवाना आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन करून गाजरे म्हणाले, प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ‘शालेय परिवहन समिती’अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबद्दल वेळोवेळी दरमहा बैठक घेऊन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घ्यावा.

ज्या खासगी व्हॅन, रिक्षा किंवा बसचालकांकडे शाळा वाहतुकीचा अधिकृत परवाना नाही, त्यांना शाळेच्या आवारात किंवा गेटजवळ विद्यार्थी सोडण्यास व नेण्यास मज्जाव करावा. शाळेच्या बस किंवा व्हॅनमध्ये विद्यार्थिनी प्रवास करत असतील, तर नियमानुसार महिला अटेंडंट (महिला मदतनीस) असणे अनिवार्य करावे. एक दक्ष पाऊल अपघाताला दूर ठेवू शकते, असे गाजरे यांनी सांगितले.

Comments are closed.