महापौरांना मुंबईपेक्षा ढाक्यात काय चालले यात रस! आदित्य ठाकरे यांच्याकडून ‘समाचार’
महापौर रितू तावडे पाणी तुंबलेल्या ठिकाणांची पाहणी करीत असताना एक पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच ‘समाचार’ घेतला. ‘महापौरांना मुंबईत काय चाललंय, यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय यात जास्त रस आहे’, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
प्रशासनाच्या आणि कंत्राटदारांच्या भ्रष्ट कारभारामुळेच मुंबईची ही अवस्था झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ते म्हणाले, ‘गेल्या तीन-चार महिन्यांत यांचे ‘हा नाला साफ केला’, ‘तो नाला साफ झाला’ असे दावे करणारे केवळ फोटो समोर आले होते. ज्या कंत्राटदारांना पालिकेने आधी काळ्या यादीत टाकले होते, त्यांनाच पुन्हा अंतर्गत कंत्राटे देण्यात आली. हे सगळे घोळ घालून ठेवल्यामुळेच आज थेट महापौरांच्या समोर मॅनहोलमध्ये एक निष्पाप व्यक्ती पडली. ‘भाजप आणि महापौर यांना कधी मुंबईची काळजी नव्हतीच. त्यांना केवळ कंत्राटदार आणि बिल्डरांची काळजी आहे. पण ज्यांच्याबद्दल तुम्हाला इतकी काळजी आहे, त्यांनी कामे तरी कशी केली, याची तरी किमान काळजी घ्यायला हवी होती.’
आलेला पाणी नाही सांभाळू शकत, पाऊस नाही!
‘गेला एक-दीड महिना मुंबईत पाण्याचे टँकर अचानक वाढले होते. पालिकेने अधिकृतपणे 10 टक्के पाणी कपात जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात मुंबईकरांना 40 ते 50 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत होता. आधी मुंबईकरांना पाण्यासाठी तरसवले आणि आता अचानक पाऊस आल्यावर महापौरांसमोरच माणूस मॅनहोलमध्ये पडला. म्हणजे तुम्हाला धड पाण्याची टंचाईही सांभाळता येत नाही. सत्ताधाऱ्यांनी मुंबईला बुडवून दाखवले, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी हाणला.
Comments are closed.