वर्ल्ड कपच्या मध्यातच फिफाने 'या' देशावर घातली बंदी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सध्या अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. यामध्ये अनेक संघांचे तीन साखळी सामने खेळून झाले असून काहींनी शेवटच्या ३२ संघांच्या फेरीमध्ये पात्रता मिळवली आहे. रोमांचक वातावरण असताना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाशी संबंधित फिफाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नेपाळ फुटबॉल असोसिएशनला (एएनएफए) निलंबित केले आहे.

नेपाळी फुटबॉलच्या प्रशासनावरून सुरू असलेल्या दीर्घकालिन वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधीही नेपाळच्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेने एएनएफएला तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते, मात्र तो निर्णय मागे घेण्यात आला. फिफाने नेपाळवर बंदी घालण्याबाबत एक निवेदन जाहीर केले. फिफाच्या नियमावलीत कलम १४ च्या अंतर्गत तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने परिषदेच्या ब्युरोने नेपाळ फुटबॉल संघटनेला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

फिफाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, २४ जून २०२६ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत नेपाळ फुटबॉल संघटनेने फिफा नियमावलीच्या कलम १३ अंतर्गत आपले स्रव सदस्यत्वाचे हक्क गमावले आहेत. जोपर्यंत त्यांच्यावरील निलंबन उठवले जात नाही, तोपर्यंत एएनएफएचे प्रतिनिधी आणि क्लब संघ कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच त्यांचे कोणतेही सदस्य किंवा अधिकारी यांना कोणत्याही फिफा आणि आशिया फुटबॉल असोसिएशन (एएफसी) विकास कार्यक्रमांमध्ये आणि प्रशिक्षणात सहभागी होण्याची परवाणगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त निलंबन लागू असेपर्यंत एएनएफए किंवा त्याच्या संघाशी कोणताही क्रीडाविषयक संपर्क ठेवू नये, अशा सूचना सर्व संबंधित पक्षांना देण्यात आल्या आहेत.

फिफाने आपल्या नियमावलीत कलम १४ नुसार, जे सदस्य संघटनांच्या जबाबदाऱ्यांशी संबंधिक आहे, जबाबदाऱ्यांचे कोणतेही उल्लंघन शिक्षापात्र आहे, जरी त्यात तिसऱ्या पक्षाचा प्रभाव असला तरीही. यानुसार, प्रत्येक सदस्य संघटना आपल्या सदस्यांच्या कोणत्याही निष्काळजीपणा किंवा हेतूपरस्पर केलेल्या गैरकृत्यासाठी फिफाला पूर्णपणे जबाबदार असेल.

Comments are closed.