घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं पत्नीला संपवलं, हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव
बदलापूर क्राईम न्यूज: बदलापुरात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्टने आल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटलं आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या आहेत. पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. मात्र पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं तिचा काटा काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक तोंड दाबून खून करण्यात आल्याचं निष्पन्न
प्राजक्ता मेहेर असं मृत पत्नीचं नाव होतं. तिचं 2010 साली बदलापूरच्या एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहेर सोबत लग्न झालं. त्यांना 15 आणि 11 वर्षांची दोन मुलंही आहेत. मात्र काही काळापासून योगेशचे गावातच राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. यातूनच योगेशने पत्नी प्राजक्ताला घटस्फोटासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. 14 मार्च 2026 रोजी प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून हवे तितके पैसे घ्या आणि मुलीला घेऊन जा, अशी ऑफर योगेशने दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केलाय. यानंतर 8 एप्रिल रोजी योगेश आणि प्राजक्तामध्ये पुन्हा भांडण झालं. 9 एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदही केली. मात्र प्राजक्ताच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यानं मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि व्हिसेरा सांभाळून ठेवण्यात आला. याचाच रिपोर्ट 23 जून रोजी आला, ज्यात प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक तोंड दाबून खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालं.
पुरावे गोळा करण्याचं काम सुरू
या घटनेनंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना अटक केली आहे. तर या प्रकरणात योगेशची प्रेयसी पूजा मेहेर, तसंच नणंद हर्षदा कोंडीलकर, कुसुम बोराडे यांनाही आरोपी करण्याची प्राजक्ताच्या कुटुंबियांची मागणी आहे. त्यानुसार तपास सुरु असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.